छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर - अंकाई या ९२ कि.मी. रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. आजघडीला दुहेरीकरणाच्या दृष्टीने १० पुलांवर काम सुरू आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार यांनी दिली. त्याबरोबर दौलताबादसह जालना जिल्ह्यातील दिनेगाव येथे मालधक्का होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनच्या पाहणीसाठी नीती सरकार या मंगळवारी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर - अंकाई रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रगतिपथावर आहे. ३० महिन्यांत म्हणजे जून २०२७ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य दक्षिण मध्य रेल्वेने ठेवले आहे. अंकाई ते करंजगाव आणि करंजगाव ते छत्रपती संभाजीनगर अशा दोन स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या. शिवाय कामाची गती वाढण्यासाठी अंकाई ते करंजगाव आणि करंजगाव ते छत्रपती संभाजीनगर अशा दोन टप्प्यांत काम करण्यात येत असल्याचे नीती सरकार यांनी सांगितले.
३० कि.मी. जमिनीचे सपाटीकरणअंकाई ते करंजगादरम्यान आतापर्यंत ३० कि.मी. अंतराच्या जमिनीची सपाटीकरण झाले आहे. रेल्वे रूळ टाकण्यापूर्वी अनेक थर टाकावे लागतात शिवाय अंकाई ते करंजगादरम्यान १० पुलांवरही काम सुरू आहे तर करंजगाव ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान १० किलोमीटर अंतराचे जमिनीचे सपाटीकरण झाले आहे,अशी माहिती नीती सरकार यांनी दिली.
मालधक्क्यासाठी भूसंपादन सुरूदौलताबाद आणि दिनेगाव या दोन ठिकाणी मालधक्का होणार आहे. दौलताबाद येथे भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मालधक्का दौलताबाद येथे स्थलांतरीत केला जाईल. दिनेगाव येथे रेल्वे लाइनचेही काम होत आहे, असे नीती सरकार यांनी सांगितले.