Women's Day Special : रुग्णांमध्ये देव शोधणाऱ्या सिस्टर : कौशल्या कानन सोलंकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:06 IST2019-03-08T12:05:14+5:302019-03-08T12:06:23+5:30

नोकरीतूनच मिळाला रुग्णसेवेचा वसा

Women's Day Special: Sister seeking God in patients: Kaushalya Kanan Solanki | Women's Day Special : रुग्णांमध्ये देव शोधणाऱ्या सिस्टर : कौशल्या कानन सोलंकी

Women's Day Special : रुग्णांमध्ये देव शोधणाऱ्या सिस्टर : कौशल्या कानन सोलंकी

- प्रकाश जाधव

औरंगाबाद : कुटुंबाला आर्थिक सक्षमता मिळवून देण्यासाठी एका महिलेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अर्थात ‘घाटी’त परिचारिकेची नोकरी सुरू केली. परिस्थितीने पिचलेले अन् आजाराने त्रासलेले रुग्ण बघून संवेदनशील मन हेलावले आणि पगारासाठी सुरू केलेल्या या नोकरीनेच रुग्णसेवेचा वसा दिला. मंदिरात जाते; पण दान कधीच करीत नाही. त्याच पैशांतून रुग्णांना मदत करते... घाटीतील नेत्र विभागात कार्यरत रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या सिस्टर कौशल्या कानन सोलंकी सांगत होत्या. 

कौशल्या मूळच्या उत्तरांचलच्या. लष्करात असलेले वडील निवृत्त झाले आणि कौशल्या औरंगाबादेत स्थिरावल्या. पुढे घाटीत परिचारिका म्हणून त्या रुजू झाल्या. नोकरीनेच त्यांना रुग्णसेवेकडे नेले. याविषयी कौैशल्या सिस्टर म्हणाल्या, घाटीत नोकरी सुरू केल्यानंतर गरिबी काय असते? याची पदोपदी जाणीव झाली. आपल्या नोकरीवर आपले घर चालणार असल्याने कामात झोकून द्यायचे ठरविले. घाटी गरिबांसाठी आधारवडच असल्यामुळे रुग्णसंख्या जास्त. त्याचा ताण कर्मचाऱ्यांवरही पडतो. मात्र, कितीही ताण आला तरी काम करीत राहाचेच. आपले काम आनंदाने केले तर मनाबरोबरच रुग्णांनाही उभारी मिळते. मग रुग्णांना होईल तेवढी मदत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ते आजही करीत आहे. रुग्णांवर मी कधीच चिडत नाही. मंदिरात दर्शनाला जाते; पण एक पैसाही कधी दानपेटीत टाकत नाही. त्याच पैशांतून गरीब रुग्णांना मदत करते. माझे पती व मुलांचेही मला खूप सहकार्य लाभते... आपला प्रवास कौशल्या सिस्टर उलगडत होत्या.

मराठवाड्यासह राज्यातून येणाऱ्या गरीब आणि घाटी परिसरात राहणाऱ्या बेवारस रुग्णांसाठी कौशल्या सिस्टर पुढे आल्या. कधी पैसे. कधी कपडे, तर कधी औषधी. मिळेल त्या मार्गाने कौशल्या सिस्टर रुग्णांना मदतीचा हात देतात. त्यासाठी घरातील वा नातेवाईकांकडील सुस्थितीतील कपडे त्या जमा करतात आणि रुग्णांना देतात. घर आणि नोकरी सांभाळताना होणाऱ्या दगदगीनंतरही त्या चिडताना कधीच कोणी पाहिले नाही. याविषयी कौशल्या सिस्टर म्हणाल्या, आपली प्रतिमा वागण्या-बोलण्यावरच ठरते. चिडचिड केल्याने समोरच्या बरोबरच स्वत:लाही मनस्ताप होतो. यातला मध्यम मार्ग म्हणजे समजावून सांगणे आणि स्वत:ही समजावून घेणे. त्यातून सारे काही व्यवस्थित होत जाते.

गरीब रुग्णांच्या औषधीसाठी... 
घाटीत औषधींचा तुटवडा असेल तर बाहेरून औषधी आणायला सांगितले जाते. अनेक रुग्णांकडे कमी पैसे असतात. अशावेळी कौशल्या सिस्टर समाजसेवी संघटनांना मदत करण्याचे आवाहन करतात. अनेकवेळा वॉर्र्डातीलच चांगली परिस्थिती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना औषधी आणण्याची विनंती करतात. त्यातून अनेक गरीब रुग्णांना दिलासा मिळतो.

Web Title: Women's Day Special: Sister seeking God in patients: Kaushalya Kanan Solanki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.