भाज्या महागल्याने महिलांचे बजेट कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 15:30 IST2019-06-27T15:27:01+5:302019-06-27T15:30:35+5:30
पाणीटंचाईचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर

भाज्या महागल्याने महिलांचे बजेट कोलमडले
औरंगाबाद : श्रावण घेवडा ८० रुपये, हिरवी मिरची ८० रुपये, वांगे, गवार, भेंडी ६० रुपये प्रतिकिलो हे भाव ऐकले की, सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होत आहेत. शहरात येणाऱ्या बहुतांश भाज्या नाशिक, पुण्याहून आणल्या जात आहेत. आवक कमी झाल्याने भाज्या महागल्या आहेत. सर्वसामान्य महिलांचे बजेट कोलमडले आहे.
पाणीटंचाईने भाजीपाल्याच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. जिल्ह्यातूनच आवक कमी होत असल्याने अडत व्यापारी नाशिक, पुण्याहून भाज्या मागवीत आहेत. आवक कमी व मागणी जास्त असल्याने भाज्यांचे भाव वधारले आहेत. लिंबू ८० रुपये किलो, हिरवी मिरची ८० रुपये, टोमॅटो ५० ते ६० रुपये, पत्ताकोबी २० ते २५ रुपये, फुलकोबी ४० ते ५० रुपये, कारले ६० रुपये, दुधी भोपळा २५ ते ३० रुपये, तर शेवग्याच्या शेंगा ६० रुपये प्रतिकिलोने विकत आहेत. एवढेच नव्हे, तर लसूण व अद्रकच्या भावाने प्रतिकिलो १०० रुपयांचा आकडा गाठला आहे. हायब्रीड लसूण ८० ते गावरान लसून १०० रुपये किलोने विकत आहे. एरव्ही भाज्या स्वस्त झाल्या की, गल्लीबोळांतून फिरणाऱ्या हातगाड्या आता गायब झाल्या आहेत. कारण, हातगाडीवर महागड्या भावात ग्राहक भाज्या खरेदी करीत नाहीत. त्यासाठी ग्राहक परिसरातील भाजीमंडीतच जात आहेत. हातगाड्यावर लसूण विक्रीला येत आहे. मात्र, गावरान म्हणून ग्राहकांना हायब्रीड लसूण दिला जात आहे. १५ ते २० रुपये किलोदरम्यान कांदे व बटाटे विकले जात आहेत. अनेक ग्राहक १५ दिवस पुरतील एवढेच कांदे, बटाटे खरेदी करीत आहेत. येत्या काळात सतत पाऊस राहिला तर भाज्यांचे भाव वाढतील. जर अंतराने पाऊस पडत राहिला तर उत्पादन वाढून भाव कमी होतील, असे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.
पालेभाज्याही महागच
पालेभाज्यांची आवकही कमी झाली आहे. जिथे औरंगपुरा भाजीमंडीत ४ ते ५ हजार गड्डी पालेभाज्या येतात तिथे सध्या १ ते दीड हजार गड्डी पालेभाज्या विक्रीसाठी येत आहे. परिणामी, पालेभाज्या महागल्या आहेत. सर्वात महाग मेथी २० रुपये गड्डी विकली जात आहे. गावरान कोथिंबीर, कांदापात १५ रुपये, तर पालक, चुका, शेपू या भाज्या प्रत्येकी १० रुपयांना मिळत आहेत.