औरंगाबादचे महापौरपद पाचव्यांदा महिला भूषवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 19:06 IST2019-11-14T19:04:37+5:302019-11-14T19:06:54+5:30
सध्या महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

औरंगाबादचे महापौरपद पाचव्यांदा महिला भूषवणार
औरंगाबाद : एप्रिल २०२० मध्ये महापालिकेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत खुल्या प्रवर्गातील महिलेला महापौरपदी आरूढ होण्याची संधी मिळणार आहे. औरंगाबादच्यामहापौरपदी विराजमान होणाऱ्या त्या पाचव्या महिला असतील. आज मुंबईत झालेल्या आरक्षण सोडतीत औरंगाबादचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले. महापौरपदावर डोळा ठेवून राजकीय पक्ष उमेदवारी देतील.
महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी यापूर्वी चार वेळेस राखीव झाले होते. १९९५ मध्ये सुनंदा कोल्हे या महापौर झाल्या होत्या. त्यानंतर २००४ मध्ये रुक्मिणीबाई शिंदे, २००७ मध्ये विजया रहाटकर, २०१२ मध्ये कला ओझा यांची निवड झाली होती. २०२० मध्ये खुल्या प्रवर्गातून महिला महापौर विराजमान होतील. सध्या महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या पदावर विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले विराजमान आहेत.
२९ आॅक्टोबर २०१७ रोजी त्यांची महापौरपदी निवड झाली होती. अडीच वर्षांचा कार्यकाळ असल्यामुळे त्यांची मुदत २९ एप्रिल २०२० रोजी संपत आहे.
पहिल्यांदाच प्रभाग पद्धत : महानगरपालिकेची निवडणूक ही प्रभाग रचना पद्धतीने पहिल्यांदाच एप्रिल २०२० मध्ये होणार आहे. प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारी सुरूकेली आहे. प्रभाग रचना तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, चार वॉर्डांचा एक प्रभाग होणार आहे. त्यामुळे ५७ वॉर्ड महिलांसाठी राखीव असणार आहेत. प्रभाग रचना करताना भौगोलिक रचनेनुसार वॉर्ड एकमेकांना न जोडता वॉर्ड क्रमांकानुसार जोडले जातील असा अंदाज आहे.