मराठा आरक्षणासाठी आमठाणच्या महिला सरपंचांनी दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 16:13 IST2023-10-25T16:13:05+5:302023-10-25T16:13:36+5:30
आमठाणा ग्रामपंचायत समोर सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे

मराठा आरक्षणासाठी आमठाणच्या महिला सरपंचांनी दिला राजीनामा
सिल्लोड: ४० दिवसांची मुदत उलटूनही मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले नाही.त्यामुळे सिल्लोड तालुक्यातील आमठाणा ग्रामपंचायतच्या सरपंच कोकीलाबाई शांताराम मोरे यांनी आज राजीनामा दिला.
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने ४० दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत संपूनही आरक्षण जाहीर करण्यात आले नाही. यामुळे अंतरवाली सराटी येथे जरांगे यांनी आजपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी ८ वाजेपासून आमठाणा ग्रामपंचायत समोर सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले. यात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरपंच कोकीलाबाई शांताराम मोरे यांनी गटविकास अधिकाऱ्याच्या नावे राजीनामा दिला. मी मराठा समाजाची असून समाजासाठी काही करू शकले नाही. आरक्षण मिळून देऊ शकले नाही. मला पदावर राहण्याचा हक्क नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.सिल्लोड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शेळके यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे मुख्यसमन्वयक डॉ.निलेश मिरकर, मारोती वराडे, प्रवीण मिरकर सहित समाज बांधव हजर होते.