कर्जदाराशी संबंध नसतानाही छत्रपती संभाजीनगरात महिलांना फायनान्स कंपन्यांचे अश्लील कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:29 IST2025-07-31T16:29:22+5:302025-07-31T16:29:38+5:30

१० ते १५ महिलांना कॉल; एका पोलिस कर्मचाऱ्याच्या नावाने फोन

Women in Chhatrapati Sambhajinagar receive obscene calls from finance companies despite not being in a relationship with the borrower | कर्जदाराशी संबंध नसतानाही छत्रपती संभाजीनगरात महिलांना फायनान्स कंपन्यांचे अश्लील कॉल

कर्जदाराशी संबंध नसतानाही छत्रपती संभाजीनगरात महिलांना फायनान्स कंपन्यांचे अश्लील कॉल

छत्रपती संभाजीनगर : कर्जधारकाशी काहीही संबंध नसतानाही सिडको तसेच जवाहरनगरमधील १० ते १५ महिलांना बुधवारी फायनान्स कंपनीच्या नावाने कॉल आले. कर्ज प्रकरणात जामीनदार असल्याचे सांगत अश्लील शिवीगाळ, धमक्या देण्यात आल्या. या संतापजनक प्रकारानंतर सहा महिलांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यावरून सुभाष राणोजी देसाई नामक व्यक्तीवर विनयभंग, धाकदपटशाही केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

एका महिलेचे जवाहरनगर परिसरात कपड्यांचे दुकान आहे. ३० जुलैला सकाळी त्यांना निगडीच्या रत्नाकर फायनान्समधून सुभाष देसाई नावाच्या व्यक्तीने कॉल केला. दीपक ससाणे नावाच्या व्यक्तीने त्यांच्या कंपनीतून दीड लाखाचे कर्ज घेतले असून, महिला जामीनदार असल्याचे सांगितले. महिलेने ती ससाणेला ओळखत नसल्याचे सांगितले. मात्र, तरीही फोनवरील व्यक्तीने पैसे भरण्यासाठी धमकावत शिवीगाळ केली. अश्लील भाषेत आरडाओरड करीत दुकानात तोडफोड करण्याची धमकी दिली.

तीन मैत्रिणींना एकाच प्रकारे कॉल
दुपारपर्यंत या महिलेच्या तीन मैत्रिणींना असेच फोन आले. सर्वांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी गुन्हा दाखल केला.

दोन गुन्हे दाखल
अशाच प्रकारे कॉलद्वारे कर्ज प्रकरणात जामीनदार असल्याचे सांगून फॅशन अकॅडमी चालविणाऱ्या एका महिलेलाही कॉल आला. या तक्रारीवरून पोलिसांनी राणोजीवर दुसरा गुन्हा दाखल केला.

सिडकोतील महिलांनाही कॉल
सिडको परिसरात राहणाऱ्या जवळपास चार महिलांना असेच फोन आले. पोलिसांनी तपास सुरू करताच देसाई उल्लेख करीत असलेले ससाणे हे पोलिस कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले. ससाणे यांनी कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे रक्कम उचलली होती. ते प्रकरण ससाणे यांनी निकालीही काढले होते. ते पत्र त्यांनी पोलिसांकडे सादर केले.

क्रमांक कोणी दिले ?
ससाणे व सदर महिलांची ओळखही नाही. मात्र, तरीही मैत्रिणी असलेल्या एकाच ग्रुपमधील १० ते १५ महिलांना एकाच दिवशी कॉल गेले. पोलिसांनी आता त्यांचे क्रमांक आरोपींकडे गेले कसे, बँकेची यात कुठली भूमिका आहे, याचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Women in Chhatrapati Sambhajinagar receive obscene calls from finance companies despite not being in a relationship with the borrower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.