"छत्रपती संभाजीनगरातील महिला पाकिस्तानची गुप्तहेर"; ई-मेलने तपास यंत्रणा हादरल्या
By सुमित डोळे | Updated: August 30, 2023 19:28 IST2023-08-30T19:28:12+5:302023-08-30T19:28:41+5:30
छत्रपती संभाजीनगरातील या महिलेने आधी सौदी अरेबिया व नंतर काही महिने लिबियामध्ये प्रियकरासोबत वास्तव्य केले.

"छत्रपती संभाजीनगरातील महिला पाकिस्तानची गुप्तहेर"; ई-मेलने तपास यंत्रणा हादरल्या
छत्रपती संभाजीनगर : मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करून देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यावसायिकाच्या पत्नीला पाकिस्तानच्या तरुणाने पळवून नेले. तिचा देशविघातक कृत्यांमध्ये सहभागाचा संशय असल्याचा ई-मेल तपास यंत्रणांना प्राप्त झाल्यानंतर मात्र सारे अधिकारी हादरले.
या महिलेने आधी सौदी अरेबिया व नंतर काही महिने लिबियामध्ये प्रियकरासोबत वास्तव्य केले. तिच्या पाकिस्तानमधील वास्तव्याविषयी तर्कवितर्क सुरू असून, काही दिवस तिने पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये वास्तव्य केल्याचा दाट संशय तपास यंत्रणांना आहे.
सिडको परिसरातील उच्चभ्रू कुटुंबातील ३४ वर्षीय साहिना (नाव बदलले आहे) डिसेंबरमध्ये बेपत्ता झाली. त्याच्या काही महिन्यांनंतर तिने पाकिस्तानच्या तरुणासोबत लग्न केल्याचे छायाचित्र व मेसेज पतीला प्राप्त झाले. ३ ऑगस्ट रोजी साहिना अचानक देशात परतली. मात्र, परतल्यानंतर ती देशविरोधी संघटना आयएसआयच्या संपर्कात आल्याचा ई-मेल तपास यंत्रणांना प्राप्त झाल्यानंतर हलकल्लोळ उडाला. गुप्तचर विभागाने याची गंभीर दखल घेतली. हा ई-मेल सर्वात आधी सीआयएसएफ, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्राप्त झाला होता.
संपर्क करणारा प्रियकराचा भाऊ ?
साहिना बेपत्ता झाल्यानंतर काही महिन्यांतच तिच्या कुटुंबाशी पाकिस्तानच्या प्रियकराच्या वतीने अज्ञातांनी संपर्क साधला होता. साहिनासोबतचे छायाचित्र व उर्दू भाषेतले लग्नाचे प्रमाणपत्र पाठवल्याचे सांगण्यात आले. त्या दरम्यान प्रियकराच्या अली नामक भावाने कुटुंबाशी प्रथम संपर्क साधला होता, असेही सांगण्यात येत आहे.
अद्याप देशविरोधी कृत्याचा पुरावा नाही
नऊ दिवसांपासून याप्रकरणी एटीएस, राज्य सायबर सेल व इतर गुप्तचर यंत्रणा तपास करत आहेत. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अद्याप महिलेच्या देशविरोधी कृत्यासंदर्भात कुठलाही सहभाग स्पष्ट झालेला नाही. याबाबत इतर यंत्रणांच्या समन्वयाने गांभीर्याने तपास सुरू असून ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध, साहिनाच्या प्रवासाचे मार्ग व ठिकाणे जाणून घेणे, तांत्रिकदृष्ट्या ते सिध्द होणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.