महिलेचा मांजाने कापला गळा, चार तास शस्त्रक्रिया, ४० टाके अन् लागली एक रक्ताची पिशवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:54 IST2025-01-07T15:53:29+5:302025-01-07T15:54:04+5:30
दुचाकीचालकच नव्हे, पाठीमागे बसलेल्यांनाही मांजाचा धोका

महिलेचा मांजाने कापला गळा, चार तास शस्त्रक्रिया, ४० टाके अन् लागली एक रक्ताची पिशवी
छत्रपती संभाजीनगर : नायलाॅन मांजाने जखमी होण्याच्या घटना सुरूच असून, पतीसह दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेचा गळा कापला गेल्याची घटना रविवारी सायंकाळी मोंढा नाका उड्डाणपूल परिसरात घडली. या महिलेवर एका खासगी रुग्णालयात तब्बल ४ तास शस्त्रक्रिया करण्यात आली. गळ्याला तब्बल ४० टाके द्यावे लागले. शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताची एक पिशवीही लागली.
विजया संजय पाटील (४९, रा. म्हाडा काॅलनी, एन-२ ) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्या पतीसह रविवारी सायंकाळी दुचाकीवरून क्रांती चौकाकडे जात होत्या. मोंढा नाका उड्डाणपूल परिसरात अचानक मांजा आला आणि काही कळण्याच्या आतच विजया यांचा गळा कापला गेला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मांजामुळे गंभीर जखम झाली होती. गळ्याच्या छोट्या रक्तवाहिन्याही कापल्या गेल्या. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शस्त्रक्रिया सुरू झाली. रात्री ११ वाजेच्या सुमारास ती पूर्ण झाली. सुमारे ४० टाके व रक्ताची एक पिशवीही द्यावी लागली. डाॅ. नीलेश तायडे, डाॅ. गणेश लहाने, डाॅ. देवेंद्र लोखंडे, डाॅ. जयेश टकले यांनी ही शस्त्रक्रिया केल्याची माहिती डाॅ. विनोद चावरे यांनी दिली.
फक्त मांजा नव्हे, पतंग उडविण्यावरच बंदी हवी
फक्त मांजावरच नव्हे, तर पतंग उडविण्यावरच बंदी आणली पाहिजे. विजया या दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या होत्या. दुचाकी चालविताना समोर अचानक मांजा आल्याने त्या जखमी झाल्या. माझ्याही हाताच्या बोटाला मांजाने जखम झाली.
- संजय पाटील, जखमी महिलेचे पती
मांजाने गळ्यापासून मानेपर्यंत जखम, ३५ टाके
दुसऱ्या एका घटनेत मांजामुळे एका १९ वर्षीय तरुणाच्या गळ्यापासून तर मानेपर्यंतचा भाग कापला गेल्याची घटना सोमवारी सायंकाळी टीव्ही सेंटर चौक परिसरात घडली. या जखमेला तब्बल ३५ टाके द्यावे लागले. शेख फरदीन (रा. दौलताबाद) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. कामानिमित्त शेख फरदीन हा सोमवारी सायंकाळी दुचाकीवर टीव्ही सेंटर चौक परिसरातून जात होता. मांजा अडकल्यामुळे त्याच्या गळ्यापासून तर मानेपर्यंतचा भाग कापला गेला. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या जखमेला ३५ टाके द्यावे लागले.