८ दिवस, २४ तास महिला डिजिटल अरेस्टमध्ये; मनी लाँड्रिंगची केस सांगत ६१ लाख उकळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:06 IST2025-04-24T14:05:37+5:302025-04-24T14:06:16+5:30

अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याची  धमकी, हल्ला होण्याचा दिला इशारा

Woman under digital arrest for 24 hours for 8 consecutive days, 61 lakhs stolen | ८ दिवस, २४ तास महिला डिजिटल अरेस्टमध्ये; मनी लाँड्रिंगची केस सांगत ६१ लाख उकळले

८ दिवस, २४ तास महिला डिजिटल अरेस्टमध्ये; मनी लाँड्रिंगची केस सांगत ६१ लाख उकळले

छत्रपती संभाजीनगर : नरेश गोयल नावाच्या व्यक्तीने मनी लाँड्रिंग, अंमली पदार्थांची तस्करी केली असून तुमच्या बँक खात्यावरुन त्याचे ३० ते ४० व्यवहार झाले आहेत, असे सांगत सायबर गुन्हेगारांनी शहरातील ५५ वर्षीय महिलेला तब्बल ८ दिवस २४ तास व्हिडिओ कॉलद्वारे डिजिटल अरेस्टमध्ये ठेवले. गुन्हेगारांनी ३६ दिवसांत या महिलेकडून ६१ लाख ७४ हजार रुपये उकळले. जवाहरनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल केल्याचे सायबरचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी सांगितले.

५५ वर्षीय महिला उल्कानगरीत वृद्ध आईसोबत राहते. आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या त्यांच्या पतीचे कोरोना काळात निधन झाले. ४ मार्च रोजी दुपारी त्यांना कुलाबा पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगणारा कॉल आला. नरेश गोयलने तुमच्या आधार कार्ड, पॅनकार्ड वापरून कॅनरा बँकेत खाते उघडले होते. त्याद्वारे त्याने अंमली पदार्थांची तस्करी केली असून तुमच्या खात्यावरुन ३० ते ४० व्यवहार झाल्याचे सांगितले. याची सीबीआय चौकशी सुरू असल्याचे सांगून त्यांना व्हॉट्सॲपवर सीबीआयचे बनावट पत्र देखील पाठवले. ही बाब कोणाला सांगितल्यास गुन्ह्यातील लोकांकडून तुमच्यावर हल्ला होण्याचा इशारा दिला. त्यामुळे महिला पुरती घाबरून गेली.

पैसे मिळेपर्यंत व्हिडिओ कॉल सुरूच
-आरोपींनी महिलेच्या सर्व गुंतवणुकीची, संपत्तीची माहिती घेतली. पहिल्याच दिवशी ४ तास चौकशीत बँक खात्याविषयी माहिती घेतली. या पैशांची तपासणीचे कारण सांगून बँक खाते क्रमांक देत पैसे पाठवण्यास सांगितले.
-१२ मार्च रोजी महिलेने त्यांना ४५ लाख ३० हजार पाठवले. त्याची पावती देखील आरोपींनी पाठवली. परंतु ही रक्कम मिळेपर्यंत सलग २४ तास त्यांचा व्हिडिओ काॅल सुरू होता, हे विशेष.

गोल्ड लोन काढून पैसे दिले
आरोपींनी महिलेला विविध कारणे सांगत पैशांची मागणी केली. म्युच्युअल फंड मधील पैसे काढून महिलेने त्यांना दिले. शिवाय ५ लाख ५० हजारांचे गोल्ड लोन घेऊन पैसे दिले. ९ एप्रिल रोजी पुन्हा त्याच व्यक्तीने कॉल करुन १ लाखांची मागणी केली. त्यावर महिलेने त्याला बचत गटाकडून पैसे घेत १ लाख रुपये दिले. त्यानंतर मात्र संपर्क बंद झाल्यावर महिलेला आपण फसले जात असल्याची जाणीव झाली.

या ५ बँक खात्यात पैसे
-आराेपींनी महिलेकडून ३६ दिवसांत आयडीएफसी, इंडसइंड, बंधन, नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स, उत्कर्ष स्माॅल फायनान्स बँक खात्यात पैसे वळते करुन घेतले.
-जानेवारी ते एप्रिल २०२५ दरम्यान शहरात १२ जण डिजिटल अरेस्ट मध्ये फसले. यातील बहुतांश वृद्ध असून एक शासकीय अधिकारी आहेत.

Web Title: Woman under digital arrest for 24 hours for 8 consecutive days, 61 lakhs stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.