भरधाव ट्रकने मोपेडवरील महिलेला चिरडले; येवला रोडवरील अतिक्रमणाचा ठरल्या बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 19:18 IST2022-09-10T19:17:29+5:302022-09-10T19:18:00+5:30
नागरिकांनी येवला रोडवर गवंडगाव शिवारात ट्रकला पकडले. मात्र चालक पसार झाला.

भरधाव ट्रकने मोपेडवरील महिलेला चिरडले; येवला रोडवरील अतिक्रमणाचा ठरल्या बळी
वैजापूर (औरंगाबाद): भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने उडविल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी वैजापूर येवला रस्त्यावर भाजी मंडई समोर घडली.प्रतिक्षा राजेंद्र चौधरी (४०, रा.सभाजीनगर काॅलनी वैजापूर ) असे मृत महिलेचे नाव आहे.
प्रतीक्षा चौधरी या सकाळी त्यांच्या मोपेडवरून सासरे गुलाब भट्टू चौधरी यांना बसस्थानकावर सोडण्यासाठी जात होत्या. येवला रस्त्यावरून जात असताना भाजी मंडई समोर वैजापूरहून येवलाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने पाठीमागून मोपेडला जोराची धडक दिली. या अपघातात प्रतीक्षा यांचा जागेवर मृत्यू झाला. अपघातात सापडून ट्रक अंगावरून गेल्याने प्रतीक्षा यांचा अक्षरक्ष चेंदामेंदा झाला. तर सासरे गुलाब चौधरी हे किरकोळ जखमी झाले. अपघात झाल्यानंतर चालक ट्रक घेऊन पळून गेला.
नागरिकांनी येवला रोडवर गवंडगाव शिवारात ट्रकला पकडले. मात्र चालक पसार झाला. नागरिकांनी क्लीनरला पोलीसांच्या ताब्यात दिले. मृत प्रतीक्षा या विमा एजंट होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. पती राजेंद्र खासगी शाळेत शिक्षक आहेत. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
रस्त्यावरील अतिक्रमणाचा बळी ठरल्या
वैजापूर-येवला हा राष्ट्रीय महामार्ग आहे.या मार्गावर शहरात भाजी मंडई आहे. भाजी मंडई परीसरात अनेक फळ विक्रेते हे या रस्त्यावर आपली दुकाने लावतात.त्यामुळे येथे गर्दी होऊन रहदारीस अडथळा निर्माण होतो. प्रशासकीय यंत्रणा मात्र या बाबींकडे दुर्लक्ष करतात.त्यामुळे किरकोळ अपघात मात्र येथे कायमच होत असतात.याच अतीक्रमणाचा आज प्रतीक्षा चौधरी या बळी ठरल्या आहेत.