कॉल करू द्या, म्हणून घेतलेला मोबाईल महिलेने कपड्यात लपवला; परत देण्यासाठी मागितले पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 15:19 IST2025-06-05T15:18:36+5:302025-06-05T15:19:32+5:30
आता एकटीदुकटी महिलाही करू लागली लूटमार; छत्रपती संभाजीनगरातील अदालत रोडवरील धक्कादायक प्रकार

कॉल करू द्या, म्हणून घेतलेला मोबाईल महिलेने कपड्यात लपवला; परत देण्यासाठी मागितले पैसे
छत्रपती संभाजीनगर : संकटात असल्याचे सांगत कॉल करण्यासाठी मोबाइल मागून चक्क भर रस्त्यावर महिलेनेच एका तरुणाला लुटले. सोमवारी रात्री ७:३० वाजता अदालत रोडवरील एलआयसी कार्यालयासमोर ही घटना घडली. वेदांतनगर पोलिसांनी याप्रकरणी भारती वाकोडे नावाच्या महिलेला ताब्यात घेतले.
बँकेत काम करणारे २९ वर्षीय किरण गवळे २ जून रोजी क्रांतीनगर येथे ग्राहकाकडे गेले होते. तेथे साडेतीन हजार रुपयांची वसुली करून ते अदालत रोडवरून एलआयसी कार्यालयासमोर दुसऱ्या ग्राहकाची वाट पाहत होते. त्यावेळी तेथे एका महिलेने त्यांच्याजवळ जात संकटात असल्याचे सांगून मदतीसाठी कॉल करण्याचे कारण सांगत मोबाइल मागितला. त्यांनी फोन दिला. पण तिने कोणालाही कॉल न करता मोबाइल स्वत:च्या कपड्यामध्ये ठेवून दिला. गवळे यांनी तिला मोबाइल परत मागितला. मात्र, त्यावर तिने तुझ्याकडील सर्व पैसे दे, असे धमकावले.
गळा पकडून पैसे हिसकावले
महिलेने पुन्हा मोबाइल बाहेर काढताच गवळे यांनी तो तिच्या हातातून हिसकावून घेतला. ते पुढे चालत असताना महिलेने त्यांचा पाठलाग करून गचांडी पकडली. आरडाओरडा करत त्यांच्या खिशात हात घालून २ हजार रुपये काढून घेत शिवीगाळ व मारहाण केली. तिच्या विचित्र वागण्यामुळे गवळे घाबरून गेल्याने ते जवळच्या पानटपरीवर गेले. टपरीचालकाने तिला गवळे यांना पैसे परत देण्यास सांगितले. मात्र, तिने टपरीचालकालादेखील मारण्याची धमकी देत आरडाओरड सुरू केली.
यापूर्वीही प्रतिबंधात्मक कारवाई
गवळे यांनी तत्काळ वेदांतनगर पाेलिस ठाण्यात धाव घेत निरीक्षक प्रवीणा यादव यांच्याकडे तक्रार केली. यादव यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक वैभव मोरे यांनी तिचा शोध सुरू केला. भारतीवर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, तिच्याविरुद्ध लुटमारीच्या तक्रारीसाठी कोणी समोर येत नव्हते. गवळे यांनी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करून तिला अटक केल्याचे यादव यांनी सांगितले.