कपडे वाळत घातलाना शॉक, महिलेचा मृत्यू; गंगापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 20:04 IST2022-09-20T20:03:58+5:302022-09-20T20:04:12+5:30
महिलेच्या तीन लहान मुलांनी आक्रोश केल्याने उपस्थितांनादेखील गहिवरून आले

कपडे वाळत घातलाना शॉक, महिलेचा मृत्यू; गंगापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
गंगापूर : कपडे वाळवण्यासाठी घालताना विजेचा जोरदार शॉक बसल्यामुळे तालुक्यातील काटेपिंपळगाव येथील विवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (२०) रोजी सकाळी घडली; संगीता अनिल देशमुख (२९) असे मृत महिलेचे नाव आहे. धुतलेले कपडे सुकविण्यासाठीसंगीता मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे आपल्या घराच्या छतावर गेल्या होत्या.
कपडे सुकविण्यासाठी पांगवत असताना एक कपडा वाऱ्यामुळे बाजूच्या घरासाठी गेलेल्या मीटर वायरच्या तारेत अडकला. संगीता तो अडकलेला कपडा काढण्यासाठी गेल्या, मात्र त्यावेळी पावसामुळे तारेत विद्युत प्रवाह उतरला होता. या तारेचा संगीता यांना स्पर्श झाल्याने त्यांना जोराचा शॉक बसला व त्या बाजूच्या पत्राच्या घरावर कोसळल्या. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड केल्याने स्थानिकांनी व नागरिकांच्या मदतीने त्यांना सिद्धनाथ वाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी उशिरा त्यांच्यावर शोककुल वातावरणात काटेपिंपळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या तीन लहान लहान मुलांनी आक्रोश केल्याने उपस्थितांना देखील गहिवरून आले होते. मृत संगीता यांच्या पश्चात पती, दोन मुल, एक मुलगी असा परिवार आहे. संगीता यांच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, गत तीन महिन्यात शॉक लागून मृत्यू होण्याची काटेंपिंपळगावातील ही दुसरी घटना आहे. घटनेची नोंद सिल्लेगाव पोलिसात ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहे.