लिफ्ट घेतली अन् प्राण गमावले; दुचाकीवरून तोल जाऊन पडलेल्या महिलेचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 18:53 IST2025-04-29T18:53:44+5:302025-04-29T18:53:44+5:30
दुचाकीस्वार पसार : जळगाव महामार्गावरील बाळापूर गावानजीकची घटना

लिफ्ट घेतली अन् प्राण गमावले; दुचाकीवरून तोल जाऊन पडलेल्या महिलेचा जागीच मृत्यू
पिंपळदरी ( छत्रपती संभाजीनगर) : लग्नसोहळ्यासाठी जाणाऱ्या महिलेने एका अज्ञात दुचाकीस्वाराला लिफ्ट मागितली. त्यानेही गाडी थांबवून सदर महिलेला लिफ्ट दिली. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर सदर महिलेचा तोल जाऊन खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी साडेआठ वाजता जळगाव महामार्गावरील बाळापूर गावानजीक झाला. संगीता सुभाष पांडे (वय ४०, रा. पिंपळदरी), असे मयत महिलेचे नाव आहे.
पिंपळदरी येथील संगीता पांडे या शनिवारी सकाळी अजिंठा येथे लग्नसोहळ्यासाठी निघाल्या होत्या. जळगाव महामार्गावरील बाळापूर फाटा येथे सकाळी साडेआठ वाजता संगीता यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला हात देऊन येऊ देण्याची विनंती केली. सदर दुचाकीस्वारानेही गाडी थांबवून संगीता पांडे यांना लिफ्ट दिली. मात्र, काही अंतर गेल्यानंतर पाठीमागे बसलेल्या संगीता यांचा तोल जाऊन त्या जोरात सिमेंट रस्त्यावर आदळल्या. डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घाबरून सदर अज्ञात दुचाकीस्वाराने तेथून धूम ठोकली. या अपघातानंतर अजिंठा पोलिस ठाण्याचे सपोउनि. गणेश काळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत संगीता यांना अजिंठा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर पिंपळदरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. संगीता यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सासू, सासरा असा परिवार आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद
सदरील अपघाताची घटना ही एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पळून गेलेल्या दुचाकीस्वाराचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास पोकॉ. दिलीप तडवी, रवींद्र बागुलकर हे करीत आहेत.