लग्नात १५ लाखांचे दागिने, आता कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार करत महिलेची ५० लाखांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 20:05 IST2025-09-10T20:04:53+5:302025-09-10T20:05:56+5:30

मेट्रीमोनियल ॲपवर विश्वास ठेवणे पडले महागात; बंगळूरमध्ये लग्न, महाराष्ट्रात ब्लॅकमेलिंग

Woman demands Rs 50 lakhs after complaining of domestic violence, already took 15 lacks wedding jewellery, | लग्नात १५ लाखांचे दागिने, आता कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार करत महिलेची ५० लाखांची मागणी

लग्नात १५ लाखांचे दागिने, आता कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार करत महिलेची ५० लाखांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : लग्नासाठी स्थळ सुचवणाऱ्या एका नामांकित मेट्रीमोनियल ॲपवर ओळख झालेल्या बंगळुरुस्थित महिलेने आयटी अभियंत्याला स्वत:ला अविवाहित सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. बंगळुरूमध्ये पंधरा लाखांचे दागिने, महागडे कपडे घेत लग्न केले. मात्र, महिन्याभरात बंगळुरूमध्ये त्याच्याविरोधात कौटुंबिक छळाची तक्रार करत ती मागे घेण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली. 

अभियंत्याने पोलिसांकडे धाव घेतली. त्यावरून रंजिता पितांबर छाबरिया (४५, रा. बंगळुरू) व तिचा मामा संजय माखिजा (५५, रा. सिकंदराबाद) यांच्यावर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गारखेड्यातील ४९ वर्षीय तक्रारदार आयटी अभियंते असून त्यांचा व्यवसाय देखील आहे. २०२३ मध्ये त्यांची ॲपद्वारे रंजितासोबत ओळख झाली. नंतर बंगळुरूमध्ये भेट झाली. रंजिताने स्वत: अनाथ व अविवाहित असल्याचे सांगितले. जून, २०२३ मध्ये त्यांनी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत बंगळुरूमधील एका मंदिरात लग्न केले. लग्नानंतर अभियंता रंजिताच्या घरी १५ दिवस राहिला. त्यानंतर अभियंत्याने रंजिताला छत्रपती संभाजीनगरला सोबत येण्यास सांगितले. मात्र, रंजिताने कंपनीचे काम सांगून नकार दिला. तेव्हा अभियंता एकटाच निघून आला. त्याच्या एका महिन्यातच त्यांना बंगळुरू पोलिसांकडून नोटीस आली. पत्नीला सासरी नांदवत नसल्याचे सांगून लग्न करून सोडून दिल्याचा आरोप त्यात होता. त्यामुळे अभियंत्याने तत्काळ बंगळुरू पोलिसांकडे जात त्यांची बाजू मांडत प्रकरण शांत केले.

शहरात येत पैशांसाठी ब्लॅकमेलिंग
रंजिताने बंगळुरूमध्ये संसार होऊ शकत नसल्याचे सांगत अभियंत्याला हाकलले. १५ एप्रिल, २०२५ रोजी तिने संजय माखिजासह येऊन अभियंत्याचे गारखेड्यातील घर गाठले. आरडाओरडा करत शिवीगाळ करून लग्न मोडण्यासाठी ५० लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास न्यायालयात खेचून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

रंजिता विवाहित, नव्याने प्रोफाईल तयार
अभियंत्याने बंगळुरुला जाऊन माहिती घेतली असता रंजिताचा २०१३-१४ मध्येच विवाह झाल्याचे निष्पन्न झाले. शिवाय, त्यांना पैशांची मागणी करत असतानाच तिने पुन्हा मेट्रिमोनियल ॲपवर अविवाहित असल्याची नवी प्रोफाईलही तयार केलेली दिसली.

संकटात मदत, पैसे
विवाह झाल्यानंतर भेट होत नसतानाही एप्रिल, २०२४ मध्ये रंजिताच्या बहिणीचे निधन झाले. तेव्हा अभियंत्याने तत्काळ बंगळुरूला जाऊन धीर दिला. रंजिताला आर्थिक मदतही केली. लग्नात देखील दोन्हीकडील नातेवाईकांसाठी कपडे व रंजिताला १५ लाख रुपयांचे दागिने केले. जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार यांनी या तक्रारीवरून रंजिता व तिचा मामा असल्याचे सांगणाऱ्या माखिजावर गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक अतिष लोहकरे तपास करत आहेत.

Web Title: Woman demands Rs 50 lakhs after complaining of domestic violence, already took 15 lacks wedding jewellery,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.