महिलेकडून न्यूड व्हिडिओ कॉल करून वृद्धाची ब्लॅकमेलिंग, १४ लाख उकळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 19:19 IST2025-05-02T19:17:34+5:302025-05-02T19:19:59+5:30
पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेकडून न्यूड व्हिडिओ कॉल करून वृद्धाची ब्लॅकमेलिंग, १४ लाख उकळले
छत्रपती संभाजीनगर : निर्वस्त्र अवस्थेतील महिलेने एका वृद्धाला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला. त्यादरम्यान स्क्रीनशॉट्स काढत व्हिडिओही रेकॉर्ड केला. त्यानंतर तिच्यासह सायबर गुन्हेगारांच्या टोळीने ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अवघ्या १२ तासांत वृद्धाकडून तब्बल १४ लाख ६६ हजार ७७३ रुपये उकळले. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
गारखेडा परिसरात राहणारे ६० वर्षीय वृद्ध हे एका नामांकित कंपनीतून नुकतेच निवृत्त झाले आहेत. २३ मार्च रोजी सकाळी त्यांना व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओ कॉल आला. कॉल उचलताच समोर एक निर्वस्त्र महिला होती. महिलेने कॉलदरम्यान व्हिडिओ रेकॉर्ड आणि स्क्रीनशॉट्स घेतले. काही वेळातच स्वत:ला पोलिस अधिकारी असल्याचे सांगणाऱ्यांचे कॉल येऊ लागले. ‘तुमचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यात येणार आहे, तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे’, असे धमकावत पैशांची मागणी सुरू केली. घाबरलेल्या वृद्धाने प्रकरण मिटवण्यासाठी पैसे द्यायला सुरुवात केली.
२१ हजार ते १४ लाखांपर्यंत लूट
सायबर गुन्हेगारांनी प्रथम २१ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर एकामागून एक मोनी पाटील, हेमंत मल्होत्रा, अरविंद सिंग, केहर नाथ, काजल सिंग नावाने कॉल करत एकूण १४ लाख ६६ हजार ७७३ रुपये उकळले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे तपास करत आहेत.
काय आहे हा स्कॅम ?
अचानक अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल येतो. यावर महिला, तरुणी विवस्त्र असतात किंवा कॉलवर पॉर्न व्हिडिओ लावले जातात. त्यात तुमचा चेहरा दिसेल याची काळजी घेऊन स्क्रीनशॉट्स व व्हिडिओ रेकॉर्ड केले जातात. नंतर स्वत:ला पोलिस, सायबर अधिकारी म्हणवून धमक्या देऊन पैसे उकळले जातात.
ही काळजी घ्या
-अनोळखी क्रमांकावरून आलेले व्हिडिओ कॉल उचलू नका.
-सोशल मीडियावर आपली वैयक्तिक माहिती, फोटो उघडपणे शेअर करू नका. सर्व प्रोफाईल लॉक, प्रायव्हेट ठेवा.
-असे प्रकार घडलेच तर घाबरून पैसे देऊ नका. तत्काळ सायबर पाेलिसांकडे तक्रार करा.