नाथजलसाठी अधिकचे पाच रुपये नाही दिले तर गरम पाणी देणार का? प्रवाशांच्या खिशाला कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 12:50 IST2025-02-24T12:48:32+5:302025-02-24T12:50:01+5:30

'नाथजल' या एसटी महामंडळाच्या अधिकृत बाटलीबंद पाण्याची किंमत १५ रुपये असली तरी ही बॉटल बसस्थानकांमध्ये सर्रास २० रुपयांत विकली जाते.

Will you provide hot water if you don't pay an extra five rupees for Nathjal? Scissors for the pockets of passengers | नाथजलसाठी अधिकचे पाच रुपये नाही दिले तर गरम पाणी देणार का? प्रवाशांच्या खिशाला कात्री

नाथजलसाठी अधिकचे पाच रुपये नाही दिले तर गरम पाणी देणार का? प्रवाशांच्या खिशाला कात्री

छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा चटका वाढत असून, प्रवासादरम्यान बाटलीबंद पाणी घेऊन प्रवासी तहान भागवितात. परंतु थंड पाण्यासाठी प्रवाशांना ‘एमआरपी’पेक्षा ५ रुपये अधिक मोजावे लागत असल्याची स्थिती बसस्थानक आणि रेल्वेस्टेशनवर पाहायला मिळाली.

'नाथजल' या एसटी महामंडळाच्या अधिकृत बाटलीबंद पाण्याची किंमत १५ रुपये असली तरी ही बॉटल बसस्थानकांमध्ये सर्रास २० रुपयांत विकली जाते. अधिक पैसे आकारण्याविषयी विक्रेत्यांना विचारल्यानंतर थंड करण्यासाठी ५ रुपये अधिक लागत असल्याचे सांगितले जाते. हे ५ रुपये दिले नाही तर मग उन्हाळ्यात प्रवाशांना गरम पाणी देणार का, असा सवाल प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

१५ ची बॉटल २० रुपयांना
रेल्वेस्थानक : रेल्वेस्टेशनवर १५ रुपये ‘एमआरपी’ असलेल्या पाणी बाटलीसाठी २० रुपये आकारण्यात आले. अधिक रक्कम घेण्यावरून जाब विचारल्यानंतर विक्रेत्याने ५ रुपये परत केले.

बसस्थानक : मध्यवर्ती बसस्थानकात 'नाथजल' या १५ रुपयांच्या बाटलीसाठी २० रुपये आकारण्यात आले. ५ रुपये परत देण्याची मागणी करण्यात आल्यानंतर थंड पाण्यासाठी ५ रुपये अधिक लागतात, असे विक्रेत्याने सांगितले.

म्हणे बाटली थंड करण्याचे पाच रुपये
मध्यवर्ती बसस्थानकावर ‘नाथजल’साठी ५ रुपये अतिरिक्त का घेतले, अशी विचारणा केली असता, थंड बाटलीसाठी ५ रुपये अधिक लागतात. थंड नसलेली बाटली १५ रुपयांतच देतो, असे विक्रेत्याने सांगितले.

तक्रार कोठे करायची?
बसस्थानकात पाण्याच्या बाटलीसाठी ‘एमआरपी’पेक्षा जास्त रक्कम घेतल्याबाबत स्थानकप्रमुख, आगार व्यवस्थापकांकडे तक्रार करता येते. रेल्वेस्टेशनवर स्टेशन मॅनेजरकडे तक्रार करता येईल.

कारवाई केली जाईल
रेल्वेस्टेशनवर ‘एमआरपी’नुसारच पाणी विकले जावे, यासाठी आम्ही विक्रेत्यांना वेळावेळी सूचना देतो. प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे घेतल्यास कडक कारवाई केली जाईल. अधिक पैसे आकारल्यास स्टेशनवरील अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे ‘दमरे’चे अधिकारी म्हणाले.

१५ ला देणे बंधनकारक
नियमानुसार ‘नाथजल’ १५ रुपयांनाच विक्री केली पाहिजे. थंड बाटलीसाठी अतिरिक्त पैसे घेता कामा नये. यासंदर्भात संबंधित विक्रेत्यांना सक्त सूचना केली जाईल.
- संगीता सूर्यवंशी, आगार व्यवस्थापक, मध्यवर्ती बसस्थानक

Web Title: Will you provide hot water if you don't pay an extra five rupees for Nathjal? Scissors for the pockets of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.