मराठवाड्याची तहान भागणार?, नगर अन् नाशिकचे पाणी जायकवाडीच्या दिशेनं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 06:05 PM2019-07-30T18:05:07+5:302019-07-30T18:09:29+5:30

जायकवाडीत ३ टक्के पाणी वाढले

Will the thirst for Marathwada be satisfied ? water flow comes from Nagar and Nashik | मराठवाड्याची तहान भागणार?, नगर अन् नाशिकचे पाणी जायकवाडीच्या दिशेनं

मराठवाड्याची तहान भागणार?, नगर अन् नाशिकचे पाणी जायकवाडीच्या दिशेनं

googlenewsNext
ठळक मुद्देजिवंत साठ्यात येण्यासाठी ५.३१ टीएमसी पाण्याची गरजनांदूर -मधमेश्वर वेअरमधून गोदावरी पात्रात ५३३०४ एवढ्या मोठ्या क्षमतेने विसर्ग

पैठण (औरंगाबाद ) : नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील धरणातून सोमवारी मोठ्या प्रमाणावर विसर्ग वाढविण्यात आला असून, यामुळे गोदावरीला पूर आला आहे. गोदावरीचा पूर लक्षात घेता जायकवाडी धरणात मंगळवारपासून आवक वाढणार असल्याने जायकवाडी धरण मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्याची शक्यता जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत धरणाच्या जलसाठ्यात ३ टक्के वाढ झाली असली तरीही धरण अद्याप मृतसाठ्यातच आहे. धरणाचा जलसाठा मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी ५.३१ टीएमसी पाण्याची गरज आहे.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यास काल पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून विसर्ग वाढविण्यात आले आहेत. आज दारणा धरणातून १६६८८ क्युसेक, गंगापूर धरणातून ५४९९, कडवा धरणातून १४५६० क्युसेक अशा मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात आला. या सर्व धरणांचे पाणी नांदूर-मधमेश्वर वेअरमध्ये येत असल्याने नांदूर -मधमेश्वर वेअरमधून गोदावरी पात्रात ५३३०४ क्युसेक अशा क्षमतेने विसर्ग वाढविण्यात आला आहे.गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरी नदीस मोठा पूर आला आहे. नाशिक ते पैठण दरम्यान गोदावरी काठालगतच्या गावकऱ्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जायकवाडी धरणाच्या वर वैजापूर तालुक्यातील नागमठाण बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात आज सायंकाळी २३००० क्युसेक विसर्ग होत होता. जायकवाडी धरणात २१९४९ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. सायंकाळी धरणाची पाणीपातळी १४९०.८३ फूट अशी झाली होती. धरणात एकूण जलसाठा ५८७.५७६ दलघमी एवढा झाला आहे. धरण मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी १५०.५३० दलघमी (५.३१ टीएमसी) पाण्याची गरज आहे. धरणाचा जलसाठा -६.९३ टक्के झाला आहे.
जिवंत साठा होणार

सोमवारी सायंकाळी ५ वाजता नांदूर -मधमेश्वर वेअरमधून गोदावरी पात्रात ५३३०४ एवढ्या मोठ्या क्षमतेने विसर्ग सुरू झाला आहे. गोदावरी नदीला मोठा पूर आला असून जायकवाडी प्रशासन गोदावरीतील पाण्यावर नजर ठेवून आहे. जायकवाडी धरणाच्या वर नागमठाण येथील सरिता मापन केंद्रावर गोदावरीची पाणीपातळी मोजली जात असून, गोदावरीची पाणीपातळी वाढत आहे. साधारणपणे मंगळवार सकाळपासून धरणात मोठी आवक होणार आहे. यामुळे धरण मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येईल, अशी अपेक्षा जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली आहे.

केळगाव धरण ओव्हरफ्लो
सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील केळणा नदीवर असलेले धरण १०० टक्के भरले आहे. यामुळे नदीपात्रात येणारे पाणी धरणावरून ओसंडून वाहत आहे. सध्या परिसरात हे धरण येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.मागील वर्षी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा धरण परिसरात चांगला पाऊस झाला होता. यंदाही सतत तीन दिवसांपासून परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे. यामुळे सध्या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. गेल्या तीन दिवसांपासून धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने रविवारी रात्री १२ वाजता धरण पूर्ण क्षमतेने भरले, अशी माहिती प्रकल्प कर्मचारी पाठकरी यांनी दिली. धरणातून पाणी ओसंडून वाहत असल्याने नागरिकांना आनंद झाला आहे. मात्र अवैध पाणी उपसा होणार नाही याची काळजीही प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. हे धरण भरल्यामुळे सिल्लोडला पाणीपुरवठा करणाऱ्या केळणा प्रकल्पात पाणी  वाढ होणार आहे.

Web Title: Will the thirst for Marathwada be satisfied ? water flow comes from Nagar and Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.