Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 01:31 PM2024-05-23T13:31:55+5:302024-05-23T13:46:07+5:30

Rajkummar Rao : चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान राजकुमारने आईशी संबंधित गोष्टींचा खुलासा केला. आईकडून खूप काही शिकल्याचं देखील सांगितलं.

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव सध्या चर्चेत आहे. राजकुमार त्याच्या मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात राजकुमारसोबत जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान राजकुमारने त्याच्या आईशी संबंधित गोष्टींचा खुलासा केला. आईकडून खूप काही शिकल्याचं देखील त्याने सांगितलं. तो म्हणाला की त्याने आपल्या आईसाठी एक गोष्ट सुरू केली होती जी तो तिच्या मृत्यूनंतरही आता करत आहे.

तरुण वयात तो आईसोबत शुक्रवारचं व्रत करायचा आणि आजही तो ते करत आहे असं अभिनेत्याने सांगितलं. राजकुमार राव याच्या आईचं 2016 मध्ये निधन झालं. आई गमावल्यानंतरही राजकुमारला तिची खूप आठवण येते.

राजकुमारसाठी त्याची आई प्रेरणास्थान होती. राजकुमारने अनेकवेळा आपल्या आईबद्दल मुलाखतींमध्ये भाष्य केलं आहे. कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार राव म्हणाला की, - '"मी शुक्रवारी व्रत करतो. माझी आई हे संतोषी माँ साठी करायची."

"मी पण लहानपणापासून तिला फॉलो करायला लागलो. मी वयाच्या 16 व्या वर्षापासून व्रत करत आहे आणि आता तो माझ्या आयुष्याचा एक भाग बनला आहे."

"शूट करताना, प्रमोशनवेळी त्याला थोडं मॅनेज करावं लागतं. कधी कधी मी काहीही खात नाही आणि कधी काम करत असताना मला खूप एनर्जी लावावी लागत असेल तर मग त्या दिवशी मी रात्री जेवतो."

राजकुमार रावने आई कमल यादव यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली होती. हा फोटो त्याच्या लग्नाचा आहे ज्यामध्ये तो त्याच्या आईचा फोटो बघत फ्लाइंग किस देताना दिसत आहे.

फोटो शेअर करताना राजकुमारने - "आई, तू या जगातील सर्वोत्तम आई आहेस. तुझे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत हे मला माहीत आहे. मला तुझी रोज आठवण येते. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे" असं म्हटलं आहे.

मिस्टर अँड मिसेस माही हा चित्रपट 31 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सर्वच जण या चित्रपटाची वाट पाहत आहेत.