औरंगाबादमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागणार का ? पालकमंत्री देसाई यांनी दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 06:44 PM2021-03-25T18:44:22+5:302021-03-25T18:52:04+5:30

औरंगाबाद जिल्हा सक्रीय रुग्णांच्या संख्येत देशात ६ व्या क्रमांकावर आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज जिल्ह्याच्या कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला.

Will there be lockdown in Aurangabad? Important information given by Guardian Minister Desai | औरंगाबादमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागणार का ? पालकमंत्री देसाई यांनी दिली महत्वाची माहिती

औरंगाबादमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागणार का ? पालकमंत्री देसाई यांनी दिली महत्वाची माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील कोरोनाच्या झपाट्याने पसरत असलेल्या संसर्गाला तातडीने रोखण्यासाठी चाचण्यांमध्ये भरीव वाढ करत सर्व यंत्रणांनी रूग्णसंख्येच्या वाढत्या प्रमाणात अतिरिक्त उपचार सुविधांसह सज्ज रहाण्याचे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले.जिल्ह्यात ८५ टक्के कोरोना रुग्ण सौम्य लक्षणे असलेली आहेत. तसेच कोरोना मृत्यू दर कमी असल्याचेही त्यांनी सांगितले. 

औरंगाबाद: जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊनबाबत आरोग्य विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. लोकप्रतिनिधी देखील कडक निर्बंध लावण्याच्या बाजूने आहेत. यावर मुबंईला गेल्यानंतर  मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय जाहीर करू, पुढच्या काही तासातच याबाबत चित्र स्पष्ट होईल अशी माहिती उद्योग, खनिकर्म मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. 

औरंगाबाद जिल्हा सक्रीय रुग्णांच्या संख्येत देशात ६ व्या क्रमांकावर आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज जिल्ह्याच्या कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यांनी यावेळी जिल्ह्यात रुग्ण वाढ वेगाने होत आहे, परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसते आहे असे स्पष्ट केले. तसेच लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी आदेश दिले आहेत. यासोबतच कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यासाठी सूचना केल्या आहेत अशी माहिती दिली. जिल्ह्यात ८५ टक्के कोरोना रुग्ण सौम्य लक्षणे असलेली आहेत. तसेच कोरोना मृत्यू दर कमी असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील कोरोनाच्या झपाट्याने पसरत असलेल्या संसर्गाला तातडीने रोखण्यासाठी चाचण्यांमध्ये भरीव वाढ करत सर्व यंत्रणांनी रूग्णसंख्येच्या वाढत्या प्रमाणात अतिरिक्त उपचार सुविधांसह सज्ज रहाण्याचे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यंत्रणांना निर्देशित केले. बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या काळात हा संसर्ग अधिक वाढणार असल्याचा इशारा दिला. हा धोका लक्षात घेऊन गर्दी रोखण्यासाठी प्रत्येक विभागाने अधिक खबरदारीने, तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करण्याचे निर्देशित केले. कोणत्याही परिस्थितीत रूग्णांना चांगले उपचार मिळालेच पाहीजे, त्यासाठी आवश्यक ते सर्व करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने रूग्णांचे वेळेत निदान होऊन संसर्गाला जागीच रोखण्यासाठी भरीव प्रमाणात कोरोना चाचणी केंद्र 500 पर्यंत वाढवून 10 हजारांपर्यंत चाचण्यात  वाढ करावी. शहरी, ग्रामीण सर्व ठिकाणी पर्याप्त खाटा, अत्यावश्यक उपचार सुविधा, सज्ज ठेवाव्यात. तसेच ज्या-ज्या ठिकाणी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्या ठिकाणी अधिक सतर्कतेने बंधने वाढवुन परिस्थिती नियंत्रणात आणावी. औषधांची  उपलब्धता पुरेशा प्रमाणात ठेवावी. तसेच वाजवी दरात नियमानुसार त्यांची विक्री होण्यावरही कटाक्षाने नियंत्रण ठेवावे. जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात ऑक्सीजन उपलब्धता आहे, ही समाधानाची बाब असून वाढीव व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असून लवकरच ते प्राप्त होतील, असे पालकमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही परिस्थितीत जनतेचा रोजगार, उत्पन्न बंद होऊ नये ही शासनाची भूमिका

तसेच कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम यशस्वी होणे गरजेचे असून 45 वर्षांवरील सर्वांना लस देण्याची राज्य शासनाची मागणी केंद्राने मान्य केली असून त्या दृष्टीनेही वाढीव लसीकरण केंद्राची सुविधा सज्ज ठेवत जिल्ह्यात लसीकरणाचे उद्दीष्ट पुर्ण करण्याचे सूचित करून पालकमंत्री देसाई म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत जनतेचा रोजगार, उत्पन्न बंद होऊ नये ही शासनाची भूमिका आहे. मात्र त्यासोबतच कोरोनाला रोखणे ही प्राथमिकताही आहे. याचा समतोल साधत वाढता संसर्ग रोखण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. ते यशस्वीरित्या पेलण्यात यंत्रणांची सक्रियता महत्वाची असून पहिल्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन दुसरी लाट थोपवण्याच्या जबाबदारीतून सर्वांनी आपली कार्यक्षमता वाढवण्याचे सांगून शासन आवश्यक निधीसह सर्व प्रकारचे सहाय्य जिल्ह्याला उपलब्ध करून देईल असे आश्वासन पालकमंत्री देसाई यांनी दिले. 

Web Title: Will there be lockdown in Aurangabad? Important information given by Guardian Minister Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.