नजीर शेख, औरंगाबाद
शहरी आणि ग्रामीण भागात विभागलेल्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात यंदा उमेदवारांच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर मतविभागणी होणार असून, लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना उमेदवाराला मिळालेले मताधिक्य शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट राखणार, की मतदार अन्य पर्याय निवडणार याबाबत मतदारसंघात उत्सुकता आहे.
शिवसेनेतर्फे संजय शिरसाट, काँग्रेसतर्फे जितेंद्र देहाडे, भाजपातर्फे मधुकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मिलिंद दाभाडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे गंगाधर गाडे, मनसेचे गौतम आमराव, भीमशक्तीचे जालिंदर शेंडगे, मनसेचे गौतम आमराव, काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले अर्जुन गालफाडे, बसपाचे सुगंध दाभाडे, भारिप-बहुजन महासंघाचे दीपक राऊत यांच्यासह १८ उमेदवार उभे ठाकले आहेत.
सुमारे २ लाख ३९ हजार इतके मतदान असलेला हा मतदारसंघ औरंगाबाद महापालिकेतील २३ वॉर्ड, सातारा, देवळाई, गांधेली ही गावे, बजाजनगर, वडगाव कोल्हाटी आणि वाळूज औद्योगिक वसाहतीतील काही भाग, असा विस्तारलेला आहे. शिवसेनेने संजय शिरसाट यांना दुसऱ्यांदा या मतदारसंघातून मैदानात उतरविले आहे, तर काँग्रेसने यावेळी जितेंद्र देहाडे हा तरुण उमेदवार दिला आहे. महापालिकेतील २३ वॉर्डांपैकी शिवसेनेकडे दहा वॉर्ड असून भाजपा व राष्ट्रवादीकडे प्रत्येकी तीन वॉर्ड आहेत. काँग्रेसकडे केवळ दोन वॉर्ड आहेत. पाच नगरसेवक अपक्ष आहेत. नव्याने घोषित झालेल्या सातारा आणि देवळाई नगरपालिकेच्या भागात शिवसेनेचा मतदार मोठ्या प्रमाणावर आहे.
शिवाय वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाजनगर भागातील एकगठ्ठा मतदानावर शिवसेनेची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मदार राहिलेली आहे. मात्र, यावेळी भाजपाचा उमेदवारही मैदानात असल्याने शिवसेनेची दमछाक होणार आहे. भाजपाची मदार प्रामुख्याने मतदारसंघातील संघ परिवारातील सुमारे २० हजार मतदानावर
राहील.
काँग्रेसचा पारंपरिक मतदार काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र देहाडे यांच्या पाठीशी आहे. बीड बायपासवरील शाहनगर, सातारा परिसर, देवळाई गाव, हमालवाडा या भागांतील तसेच काँग्रेसला मानणाऱ्या मराठा समाजाची मते काँग्रेस उमेदवाराची जमेची बाजू आहे. मतदारसंघातील सुमारे ७० हजार दलित मतदानामध्ये यंदा मोठी फूट पडणार आहे.
देहाडे यांच्याबरोबरच, मिलिंद दाभाडे, गंगाधर गाडे, जालिंदर शेंडगे तसेच बसपा, भारिप- बहुजन महासंघाच्या उमेदवारांमध्ये विभागले जाणार आहे. हीच अवस्था मुस्लिम समाजातील मतदारांची राहणार आहे. या मतदारसंघात सुमारे ५० हजार इतके मुस्लिम समाजाचे मतदान आहे. ही मते देहाडे, दाभाडे यांच्यासह एमआयएमचा पाठिंबा मिळविलेले गंगाधर गाडे यांच्यात विभागली जातील. अर्जुन गालफाडे हे मतदारसंघातील मातंग समाजाची मते घेतील, असे चित्र आहे.
तीन वेळा नगरसेवक राहिलेले भाजपाचे उमेदवार मधुकर सावंत यांनी अपक्ष म्हणून लढण्याची आधीच तयारी केली होती. त्यांना आता भाजपाची साथ मिळणार आहे. मिलिंद दाभाडे हे अचानकपणे रिपब्लिकन सेना सोडून राष्ट्रवादीचे उमेदवार झाले. त्यांचे स्वत:चे असे काहीच नेटवर्क नाही. मात्र, त्यांच्यासाठी मराठा मते मिळावीत, असा प्रयत्न आ. सतीश चव्हाण करीत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारसंघात शिरसाट यांना मिळालेले मताधिक्य कमी होणार आहेच मात्र, शिवसेनेच्या मतांवर त्याचा एकंदरीत काहीही परिणाम होणार नसल्याचे संजय शिरसाट यांचे म्हणणे आहे. प्रचाराची रणधुमाळी आता कुठे सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात तरी मतदारसंघाचा कल स्पष्ट झालेला नाही.
लोकसभेची लीड संजय शिरसाट राखणार का?
By admin | Updated: October 7, 2014 00:42 IST
नजीर शेख, औरंगाबाद शहरी आणि ग्रामीण भागात विभागलेल्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात यंदा उमेदवारांच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर मतविभागणी होणार
लोकसभेची लीड संजय शिरसाट राखणार का?
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}