Join us
Daily Top 2Weekly Top 5

...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 09:27 IST

महाराष्ट्रात येऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या चालकांनी स्थानिक भाषा आत्मसात केल्यास प्रवासी, पोलिस, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांशी संवाद अधिक सुलभ होईल असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.

मुंबई - रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठी शिकण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली होती. शासनाने त्यांना तब्बल १०५ दिवसांची मुदत दिली आहे. मात्र या कालावधीत जर त्यांनी किमान 'व्यावहारिक मराठी ' आत्मसात केली नाही तर १६ ऑगस्टपासून त्यांच्यावर कारवाई करणे अटळ ठरेल असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. रंगशारदा मंदिर येथे आयोजित हिंदी भाषिकांच्या नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वर्धापन दिन व जल्लोष मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यवहारिक मराठी येणे अत्यावश्यक आहे. मराठी शिकणे म्हणजे कोणावर बंधन घालणे नव्हे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा आदर करणे आहे. हिंदी भाषिक चालकांना स्वयंस्फूर्तीने मराठी शिकवण्यासाठी हाजी अराफत शेख यांनी केलेला अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे. अशा पद्धतीने चालक स्वतःहून पुढे येत असतील तर शासनदेखील त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. व्यावसायिक वाहन चालक हा केवळ चालक नसून महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती देणारा खरा शिल्पकार आहे. वाहतूक क्षेत्र हे समाजाशी थेट जोडलेले असल्याने चालकांचे बोलणे, वर्तन आणि भाषा यावर संपूर्ण व्यवस्थेची प्रतिमा अवलंबून असते असं त्यांनी नमूद केले. 

तसेच महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची भूमी आहे. प्रवासी वाहनात बसल्यानंतर त्याला आपल्या भाषेत संवाद साधता आला पाहिजे. ‘नमस्कार’, ‘कुठे जायचे?’, ‘किती भाडे होईल?’ एवढे तरी व्यावहारिक मराठी प्रत्येक चालकाला आले पाहिजे. परराज्यातून महाराष्ट्रात येऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या चालकांनी स्थानिक भाषा आत्मसात केल्यास प्रवासी, पोलिस, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांशी संवाद अधिक सुलभ होईल. गैरसमज कमी होतील आणि सेवा अधिक सुसंस्कृत बनेल. राज्य सरकारच्या माध्यमातून चालकांसाठी विविध कल्याणकारी योजना, प्रशिक्षण उपक्रम आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम राबवले जात असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

दरम्यान, मराठीला विरोध म्हणून पाहू नका. ती आपुलकीची भाषा म्हणून स्वीकारा. ‘मी मराठी, तू मराठी, मराठी आमचा स्वाभिमान’ ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आवाहन केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Act on rickshaw drivers refusing Marathi inevitable from August 16.

Web Summary : Transport Minister warns action against rickshaw drivers from August 16 if they fail to learn basic Marathi. Learning Marathi is respecting Maharashtra's culture. Government supports initiatives helping drivers learn the language for smoother communication.
टॅग्स :प्रताप सरनाईकमराठी