पत्नीने तोंडावर उशी ठेवली, प्रियकराने गळा आवळला; पतीला झोपेतच संपविण्याचा कट उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 11:25 IST2025-08-04T11:24:31+5:302025-08-04T11:25:04+5:30

प्रियकर सापडला, पत्नी पळून गेली; पडेगाव परिसरातील घटना, छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Wife puts pillow over husband's face, her lover strangles him; wife's plan to murdered Husband who obstructs in immoral relationship failed | पत्नीने तोंडावर उशी ठेवली, प्रियकराने गळा आवळला; पतीला झोपेतच संपविण्याचा कट उघड

पत्नीने तोंडावर उशी ठेवली, प्रियकराने गळा आवळला; पतीला झोपेतच संपविण्याचा कट उघड

छत्रपती संभाजीनगर : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा झोपेतच तोडांवर उशी ठेवून गळा आवळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पती खडबडून जागा झाला. त्याने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. त्याचवेळी पत्नी पळून गेली. प्रियकराला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. ही घटना शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. या प्रकरणी पतीच्या तक्रारीवरून पत्नी व प्रियकराच्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

आरोपींमध्ये पत्नी शीला सुरेश खालापुरे (वय ३६, रा. कोमलनगर, पडेगाव) आणि प्रियकर राजू भानुदास खैरे (रा. पैठणखेडा, ता. पैठण) यांचा समावेश आहे. फिर्यादी सुरेश श्रीमंत खालापुरे (४२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पत्नीसह एक मुलगा आणि मुलीसह भाड्याच्या घरात राहतात. शनिवारी रात्री ११ वाजता नेहमीप्रमाणे रिक्षा चालवून घरी परतल्यानंतर मुलांसोबत जेवण करून झोपी गेले.

मध्यरात्री एकच्या सुमारास पत्नीचा प्रियकर राजू हा घरात आला. त्याच्यासाठी पत्नीने दरवाजा उघडला. दोघांनी मिळून झोपेत असतानाच फिर्यादीचा गळा ओढणीने आवळण्यास सुरुवात केली. तेव्हा जाग आल्यानंतर फिर्यादी पलंगावरून खाली पडले. दोघांनी मारहाण सुरू केली. प्रियकर फिर्यादीच्या छातीवर बसून उशीने तोंड दाबू लागला. पत्नीने दोन हात पकडले. तेव्हा फिर्यादी जोरजोरात ओरडू लागला. या गोंधळामुळे घरमालकाला जाग आली. त्यांनी खोलीचा दरवाजा वाजवला. तेव्हा पत्नीने मागचा दरवाजा उघडून पळ काढला. त्याचवेळी फिर्यादीने प्रियकराला पकडून ठेवले. तोपर्यंत घरमालक आले. त्याशिवाय गल्लीतील इतरही लोक जमा झाले. त्यांनी प्रियकराला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी पत्नीसह प्रियकराच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक नागवे करीत आहेत.

टीव्हीचा आवाज वाढवला
पत्नीने पतीचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी घरातील टीव्हीचा आवाज मोठा केला हाेता. त्याशिवाय मुलांना अगोदरच बाहेर उभ्या असलेल्या रिक्षात बसवून ठेवले होते. प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढून आरोपी रिक्षातून पसार होण्याच्या तयारीत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Web Title: Wife puts pillow over husband's face, her lover strangles him; wife's plan to murdered Husband who obstructs in immoral relationship failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.