पत्नी नांदायला येईना, पतीकडून काही दिवसांवर लग्न असलेल्या मेव्हणीची सोशल मीडियावर बदनामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 17:51 IST2023-04-27T17:50:49+5:302023-04-27T17:51:00+5:30
तरुणीचे अवघ्या काही दिवसांवर लग्न आले असताना बदनामी करणाऱ्या मेव्हण्याविरुद्ध गुन्हा

पत्नी नांदायला येईना, पतीकडून काही दिवसांवर लग्न असलेल्या मेव्हणीची सोशल मीडियावर बदनामी
वाळूज महानगर : पत्नी नांदायला येत नसल्याने मेव्हणीची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या मेव्हण्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडिता आकांक्षा (२६, नाव बदलले आहे.) ही कुटुंबासह वाळूज उद्योगनगरीत वास्तव्यास असून, एका किराणा दुकानात अकाउंटंट म्हणून काम करते. काही दिवसांपूर्वी आकांक्षा हिच्या आईवडिलांनी नात्यातील एका तरुणासोबत तिचे लग्न जुळविले होते. ४ मे रोजी लग्नाचा मुहूर्त ठरल्याने कुटुंबाकडून आकांक्षा हिच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. आकांक्षा हिची बहीण स्मिता (नाव बदलले आहे.) हिचा विवाह चार वर्षांपूर्वी संभाजी होणाजी डावरे याच्यासोबत झाला होता.
लग्नानंतर स्मिता व संभाजी यांचे खटके उडत असल्याने स्मिता ही माहेरी निघून आल्यानंतर तिने पतीच्या विरोधात महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार केली आहे. या दोघा पती-पत्नीत सुरू असलेला वाद तसेच पत्नी नांदायला येत नसल्याने संतप्त झालेल्या संभाजी डावरे याने मेव्हणी आकांक्षा हिच्यासोबत काढलेले फोटो व अश्लील मजकुराचा संदेश आकांक्षा हिच्या व्हॉट्सॲपवर पाठवून दिला. याच बरोबर पत्नी स्मिता ही जोपर्यंत नांदायला येत नाही, तोपर्यंत मेव्हणी आकांक्षासोबत काढलेले फोटो तिच्या होणाऱ्या पतीला तसेच लग्नात व्हायरल करण्याची धमकीही संभाजी डवारे याने दिली होती. सोशल मीडियावर मेव्हणी आकांक्षा हिची नातेवाइकांत व गावात बदनामी करण्याची धमकी देत मेव्हणा संभाजी याने उद्योगनगरीतील मुख्य रस्त्यावर तिच्याविषयी अश्लील मजकूर लिहीत तिची बदनामी सुरू केली होती.
बदनामी करणाऱ्या मेव्हण्याविरुद्ध गुन्हा
अवघ्या काही दिवसांवर लग्न आले असताना मेव्हणा संभाजी डवारे याने पत्नी नांदायला येत नसल्याचा राग धरून मेव्हणी आकांक्षा हिची बदनामी सुरू केली. मेव्हणी आकांक्षासोबत काढलेले फोटो व अश्लील मजकूर तिचा होणारा पती तसेच गावात व नातेवाइकांत सोशल मीडियावर पाठवून तिची बदनामी करण्याची धमकी संभाजी डावरे याने दिली होती. मेव्हण्याकडून समाजात व नातेवाइकात बदनामी होण्याची भीतीने आकांक्षा हिने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन आरोपी संभाजी डावरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक राहुल निर्वळ हे करीत आहेत.