रुंदीकरणाची घोषणा ३० मीटरची, कारवाई ३५ वर! ऐनवेळी ५ मीटर वाढवल्याने तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 15:14 IST2025-07-08T15:10:05+5:302025-07-08T15:14:31+5:30
अलीकडेच शासनाने शहरासाठी नवीन विकास आराखडा मंजूर केला. त्यात हा रस्ता ३५ मीटर रुंदीचा दाखवण्यात आला आहे.

रुंदीकरणाची घोषणा ३० मीटरची, कारवाई ३५ वर! ऐनवेळी ५ मीटर वाढवल्याने तणाव
छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहर विकास आराखड्यात दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट हा रस्ता ३० मीटर दर्शविण्यात आला. त्यानुसार मालमत्ताधारकांनी परवानगी घेऊन घरगुती, व्यावसायिक इमारती उभारल्या. महापालिकेनेही रुंदीकरण मोहीम ३० मीटरनुसार करण्याची घोषणा केली. मात्र, सोमवारी प्रत्यक्षात दिल्ली गेट परिसरात कारवाई करताना महापालिकेने नवीन विकास आराखड्यात रस्ता ३५ मीटर असल्याचा मुद्दा काढला. त्यानुसार काही मालमत्तांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंटपर्यंत जुन्या विकास आराखड्यानुसार म्हणजेच ३० मीटरवर कारवाई करण्याचे जाहीर केले. रस्त्याच्या डावीकडे १५, तर उजवीकडे १५ मीटर असे सांगितले. या भागातील बहुतांश मालमत्तांना बांधकाम परवानगीही त्यानुसारच दिली आहे. अलीकडेच शासनाने शहरासाठी नवीन विकास आराखडा मंजूर केला. त्यात हा रस्ता ३५ मीटर रुंदीचा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे दुभाजकाच्या एका बाजूला साडेसतरा मीटर आणि दुसऱ्या बाजूला साडेसतरा मीटर अशी रस्त्याची रुंदी करण्यात आली आहे. नवीन रुंदी गृहीत धरून कारवाई सुरू केली. त्यामुळे अडीच मीटर जास्तीचे मार्किंग करून पाडापाडी करण्यात आली. त्यातही व्यावसायिक मालमत्ता असल्यास १७.५ मीटर, तर निवासी असल्यास १५ मीटर असा दुजाभाव महापालिकेने केला. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती.