लग्नाला का बोलावले नाही? निमंत्रण न दिल्याने मित्राने पाडले नवरदेवाचे दात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 13:10 IST2022-04-20T13:09:03+5:302022-04-20T13:10:47+5:30
वादावादी होऊन नवरदेवास हातातील कडे मारून गंभीर जखमी केले

लग्नाला का बोलावले नाही? निमंत्रण न दिल्याने मित्राने पाडले नवरदेवाचे दात
औरंगाबाद : लग्नाला ओळखीच्या मित्राला बोलावले नाही. लग्नाची माहिती मित्राला झाल्यानंतर त्याने लग्न केल्याचे सांगितले का नाही, असा जाब विचारला. त्यावर नवरदेवाने तुला कोणी सांगितले, असे म्हणताच हातातील कड्याने नवरदेवाचे दात पाडल्याची घटना वसुंधरा कॉलनी येथे १३ एप्रिल रोजी रात्री घडली. याप्रकरणी छावणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद रामजी अंभोरे (३२, रा. छत्रपती शाहू नगर, बजाज नगर, एमआयडीसी वाळूज) यांचे नुकतेच लग्न झाले आहे. अरविंद यांनी लग्नात मित्र कुणाल कैलास सपकाळ (रा. वसुंधरा कॉलनी, नंदनवन कॉलनी) यास बोलावले नव्हते. १३ एप्रिल रोजी वसुंधरा कॉलनीत भेट झाल्यानंतर वादावादी होऊन कुणालने नवरदेवास हातातील कडे मारून जखमी केले.
यामध्ये अरविंदचे अनेक दात ढिले झाले. काही पडले आहेत, तसेच ओठाला मोठी जखम झाली. कुणालने रॉडने नवरदेवाच्या पाठीत व डोक्यात मारहाण केली. याप्रकरणी नवरदेवाच्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.