रामजन्मभूमीप्रमाणेच महाबोधी महाविहार बौद्धांच्या हवाली का नाही? भीमराव आंबेडकरांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 14:49 IST2025-10-20T14:48:02+5:302025-10-20T14:49:09+5:30
देशभरात सध्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.

रामजन्मभूमीप्रमाणेच महाबोधी महाविहार बौद्धांच्या हवाली का नाही? भीमराव आंबेडकरांचा सवाल
छत्रपती संभाजीनगर : बुद्धगयेतील महाबोधी महाविहार हा केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील बौद्धांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. रामजन्मभूमीप्रमाणे निकष लावून महाविहार बौद्धांच्या हवाली का केले जात नाही, त्यासाठी पुराव्यांची मागणी का केली जाते, असा सवाल अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी रविवारी येथे उपस्थित केला.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या आदर्श बौद्ध समाजाच्या निर्मितीसाठी धम्म प्रचार-प्रसाराच्या कार्याला आपले आयुष्य वाहून घेतलेले भदन्त करुणानंद थेरो यांचा महाथेरो विधान समारंभ आणि कठीण चिवरदान धम्मसोहळा रविवारी (दि.१९) नागसेन वनातील मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला.
या धम्मसोहळ्याचे उद्घाटन भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते म्हणाले, देशभरात सध्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. सम्राट अशोकांनी ज्या महाविहाराची निर्मिती केली, ज्या बुद्धगयेत तथागत भगवान गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली ते ऐतिहासिक स्थळ फक्त आणि फक्त बौद्धांचेच आहे. ते अन्य दुसऱ्या कोणाचेही असू शकत नाही. ब्रिटिश इतिहासकारांनी महाबोधी महाविहाराचा इतिहास लिहून ठेवला आहे. चिनी प्रवाशांनीही या ऐतिहासिक भूमीची नोंद करून ठेवली आहे. परंतु, बुद्धगयेतील महाबोधी महाविहारावर बौद्धांनी हक्क सांगितल्यानंतर त्याचे पुरावे लागतील, असे सांगण्यात आले.
अयोध्येतील रामजन्मभूमीत उत्खनन सुरू करण्यात आले तेव्हा बौद्ध धम्माशी संबंधित अवशेष सापडले. त्याच आधारे आम्ही रामजन्मभूमी बौद्धांची असल्यामुळे ती बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी, अशी मागणी करणारी पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली आणि आमच्या वकिलालाच एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. देशात कोणत्या जाती-धर्माचा पक्षकार आहे, हे पाहून न्याय दिला जात आहे, असेही भीमराव आंबेडकर म्हणाले.
कोणत्याही धम्मसोहळ्यात भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसोबतच राजा सम्राट अशोकाचीही प्रतिमा ठेवली पाहिजे आणि सम्राट अशोकाची जयंतीही तेवढ्याच थाटामाटात साजरी करण्यात आली पाहिजे, असेही आंबेडकर म्हणाले.
देशात धम्म परिवर्तनाची नांदी
देशात धम्म परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे. जेवढ्या गतीने आपण पुढे जात आहोत, तेवढ्यात ताकदीने आपणाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय संविधानाच्या कलम २५ नुसार धर्मांतर हा मूलभूत हक्क आहे. परंतु, धर्मांतर विरोधी कायदे करून धर्मांतराच्या घटनात्मक मूलभूत हक्काचे उल्लंघन करण्यात येत आहे. आता देशात जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. त्यावेळी धर्माच्या रकान्यात बौद्ध आणि जातीच्या रकान्यात न विसरता तुमची जात लिहा. तुम्ही महार, मातंग, चांभार या जातीतून बौद्ध धम्म स्वीकारला असेल तर तुमची जात आवश्य नोंदवा आणि देशात धम्मक्रांती गतीमान आहे, हे दाखवून द्या. धर्माच्या रकान्यात बौद्ध आणि जातीच्या रकान्यात तुमची जात लिहिल्याशिवाय बौद्धधर्मियांची नेमकी संख्या कळणार नाही, असे भीमराव आंबेडकर म्हणाले.
यावेळी भदन्त शरणानंद महाथेरो, भदन्त डॉ. खेमधम्मो महाथेरो, भदन्त बोधीपालो महाथेरो, भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, भिक्खू विशुधानंदबोधी महाथेरो, भदन्त विनय रक्खित महाथेरो, भदन्त सुमनवन्नो महाथेरो, भदन्त प्रा. डॉ. एम. सत्यपाल, भदन्त एस. प्रज्ञाबोधी महाथेरो, भिक्खू धम्मबोधी महाथेरो यांच्यासह या धम्मसोहळ्याचे निमंत्रक प्रा. प्रदीप रोडे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे, मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान, स्मार्टसिटीचे उपायुक्त रविंद्र जोगदंड, जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे, आंतरराष्ट्रीय गायक पावा, सा.बां. वि. चे अधीक्षक अभियंता एस. एस. भगत आदींची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यासाठी देशभरातून हजारो उपासक, उपासिका सहभागी झाले होते.