धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:48 IST2025-11-17T16:46:45+5:302025-11-17T16:48:44+5:30
एवढ नालायक सरकार अजून बघितल नाही! मनोज जरांगे पाटील यांचा संताप अनावर

धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
वडीगोद्री (जालना): मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर 'घातपाताचा कट रचल्या'चा गंभीर आरोप करत, या प्रकरणात राजकारण केल्याबद्दल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा पुन्हा एकदा ठामपणे केला असून, या संपूर्ण प्रकरणावरून सरकारवरील आपला विश्वास उडाल्याचे स्पष्ट केले.
सोमवारी अंतरवाली सराटी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली. "माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, ती घटना सत्य आहे," असे जरांगे पाटील म्हणाले. "माझा घातपात धनंजय मुंडे यांनी घडवून आणला होता. मी असल्या हिजडे चाळे करणाऱ्याला मोजत नाही," अशा अत्यंत कठोर शब्दांत त्यांनी मुंडे यांच्यावर हल्ला चढवला.
अजित पवारांसमोर लोटांगण
"त्याने तिथे जाऊन अजित पवारांना सांगितलं, मी जो जरांगे पाटलांचा घातपाताचा प्रयत्न केलाय त्याच्या चौकशीपासून मला वाचवा. मी जर चौकशीला गेलो, तर माझ्या लोकांना मराठ्यांची लोकं मारतील. तेव्हापासून तो फरार आहे. मला वाचवा म्हणून अजितदादांच्या पायावर लोटांगण घेतोय," अशी जहरी टीका जरांगे यांनी केली.
फडणवीसांवर राजकारण केल्याचा आरोप
जरांगे यांनी या प्रकरणाला संरक्षण दिल्याबद्दल थेट फडणवीस यांना लक्ष्य केले. जरांगे पाटील म्हणाले, " वर्षा बंगल्यावरच्या देवबाप्पाने सांगितलं जणू, २४ तारखेला पूजा कर वैद्यनाथाची आणि लाग प्रचाराला. फडणवीस साहेब, तुम्ही यात राजकारण करायला नको होतं. धनंजय मुंडे यांच्या पापामध्ये तुम्ही का सहभागी होत आहात?"
सरकारवर अविश्वास
"धनंजय मुंडेने माझ्या घातपाताचा प्रयत्न केला त्याला चौकशीला बोलवायला पाहिजे होतं, अटक करायला पाहिजे होती. का नाही केली?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "आमचा आता सरकारवरचा विश्वास उडाला आहे, एवढा नालायक सरकार आम्ही अजून बघितलं नाही." जरांगे यांनी धनंजय मुंडेंना "बेट्या, तू माझ्या नादी लागला एवढं ध्यानात ठेव" असा थेट इशारा दिला. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंना यातून 'सूट' दिल्याची टीका केली.