सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेध; आंदोलनात न आल्याने सरकारी वकिलाला धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:56 IST2025-10-15T13:50:32+5:302025-10-15T13:56:27+5:30
सरकारी वकिलाला दालनात धक्काबुक्की करून अंगावर बूट फेकण्याचा प्रयत्न

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेध; आंदोलनात न आल्याने सरकारी वकिलाला धक्काबुक्की
छत्रपती संभाजीनगर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी न झाल्याचा ठपका ठेवत जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकिलाला त्यांच्या दालनात घुसून एका वकिलाने धक्काबुक्की केली. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ही घटना घडली. वीजपुरवठा खंडित झाल्याने मंगळवारी रात्री १२:०० वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ शहरात सोमवारी वकील संघटनांनी काम बंद आंदोलन केले. या आंदोलनात सरकारी वकील सहभागी झाले नाही, असा आरोप करण्यात आला. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या वकिलाचा व सरकारी वकिलाशी वाद झाला. त्यातून त्यांना धक्काबुक्की करीत त्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा न्यायालयात दाखल झाला. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनीही न्यायालयात धाव घेत सरकारी वकिलाशी चर्चा केली. घटनेनंतर ते रुग्णालयात तपासणीसाठी गेले. वैद्यकीय तपासणीनंतर वेदांतनगर पोलिस ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यादरम्यान सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख हे ठाण्यात उपस्थित होते. रात्री ०८:०० वाजेपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने वेदांतनगर पोलिस ठाण्यात दोन महत्त्वाचे गुन्हे दाखल करण्यास विलंब झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.