महापालिका निवडणूकीसाठी कोण कुणाचा मित्र...समजणे सध्या तरी अवघड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 19:56 IST2020-03-09T19:53:08+5:302020-03-09T19:56:43+5:30
औरंगाबादेत सध्या कालचे भाऊ, आजचे वैरी झाले असल्याचे दिसून येत आहे.

महापालिका निवडणूकीसाठी कोण कुणाचा मित्र...समजणे सध्या तरी अवघड!
औरंगाबाद : युद्धात, प्रेमात आणि राजकारणात सारेकाही माफ असते, असे म्हटले जाते. औरंगाबाद मनपाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तारीख जाहीर व्हावयाची आहे. प्रत्येक पक्ष निवडणुकीची तयारी करीत आहे; परंतु औरंगाबादेत सध्या कालचे भाऊ, आजचे वैरी झाले असल्याचे दिसून येत आहे.
भाजप-शिवसेना एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. कालपर्यंत सत्तेतले हे पक्ष आता एकमेकांविरुद्ध उग्र टीकाटिप्पणी करीत आहेत. कालपर्यंत शिवसेनेचे विरोधक असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आज त्यांचे मित्र बनलेले आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मनसे भाजपच्या मदतीला धावून जात आहे; पण औरंगाबादेत मनसेची ताकद नसल्याचे यापूर्वीच्या मनपा निवडणुकीत दिसून आले आहे. झेंडा बदलल्यानंतर मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे औरंगाबादला येऊन गेले; परंतु समाधानकारक प्रतिसादाअभावी त्यांना दौरा आटोपता घ्यावा लागला. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची आघाडी महाराष्ट्राने पाहिली ; परंतु लोकसभेतील वातावरण विधानसभेत दिसले नाही. दोघेही वेगवगळे झाले. आता मनपा निवडणुकीत हे पक्ष एकत्रित येतील का, ही चर्चा आहे. दिल्ली विधानसभेत यश मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीला औरंगाबाद मनपात काही कामगिरी करावी, असे वाटतेय.
सारेच अनुत्तरित
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यामुळे औरंगाबादेतील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जिवात जीव आलेला आहे; परंतु मनपा निवडणुकीत ही महाविकास आघाडी होते का, सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीला गरज वाटते का, हे सारेच मुद्दे सध्या अनुत्तरित आहेत.