कोण होणार कुलगुरू? पाच नावे बंद लिफाफ्यात कुलपतींकडे सुपूर्द

By राम शिनगारे | Published: December 1, 2023 07:49 PM2023-12-01T19:49:28+5:302023-12-01T19:53:40+5:30

कुलगुरू निवड अंतिम टप्प्यात; २४ पैकी २२ जणांची मुलाखतीला हजेरी

Who will be the vice chancellor? Five names are handed over to the Chancellor in a sealed envelope | कोण होणार कुलगुरू? पाच नावे बंद लिफाफ्यात कुलपतींकडे सुपूर्द

कोण होणार कुलगुरू? पाच नावे बंद लिफाफ्यात कुलपतींकडे सुपूर्द

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी बुधवारी (दि. २९) सकाळी नऊ वाजल्यापासून हजर २२ पात्रताधारकांच्या मुलाखती शोध समितीने घेतल्या. त्यातील पाच जणांच्या नावाची शिफारस केलेला बंद लिफाफा कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे सायंकाळी सुपूर्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिफारस केलेल्या पाच जणांपैकी एकाची कुलगुरूपदी कुलपती निवड करणार आहेत. त्यामुळे कुलगुरू निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुलगुरू निवडीसाठी एआयसीटीईचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती स्थापन केली होती. या समितीने बुधवारी २४ पात्रताधारकांना मुलाखतीसाठी मुंबईतील आयआयटी, पवई येथे निमंत्रित केले होते. त्यापैकी २२ जणांनी मुलाखत दिली. डॉ. राजीव गुप्ता आणि प्रा. एस. के. सिंग हे दोन उमेदवार मुलाखतीसाठी अनुपस्थित होते. सकाळी ९ वाजता प्रत्यक्ष मुलाखतींना सुरूवात झाली. प्रत्येक उमेदवाराने ‘पॉवर पाॅईंट प्रेझेंटशन’च्या माध्यमातून आपले विद्यापीठाविषयीचे व्हिजन-मिशन मांडले. सर्वांच्या मुलाखती पार पडल्यानंतर शोध समितीने पाच जणांच्या नावाची शिफारस कुलपतींकडे सायंकाळी बंद लिफाफ्यात केली. या पाच जणांना कुलपती राजभवनात मुलाखतीसाठी आमंत्रित करतात. त्यानंतर त्यातील एकाची निवड कुलगुरू म्हणून केली जाते.

विद्यापीठाला मिळणार १७ वे कुलगुरू
विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर पहिले कुलगुरू म्हणून मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य एस. आर. डोंगरकेरी यांनी पदभार स्वीकारला. विद्यमान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे सोळावे कुलगुरू ठरले होते. आता विद्यापीठाला पूर्णवेळ १७ वे कुलगुरू मिळणार आहेत. त्यांच्या नावाविषयी विद्यापीठाच्या वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसातच पाच नावे समोर येतील. तेव्हा १७ व्या कुलगुरूंचे नाव समोर येणार आहे.

Web Title: Who will be the vice chancellor? Five names are handed over to the Chancellor in a sealed envelope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.