औरंगाबाद जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण ? इच्छुकांची संख्या अधिक असल्याने निवडीत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:08 PM2019-06-06T13:08:21+5:302019-06-06T13:11:40+5:30

प्रक्रियेत हरिभाऊ बागडे यांचा शब्द महत्त्वाचा ठरणार आहे

Who is the President of Aurangabad District Bank? | औरंगाबाद जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण ? इच्छुकांची संख्या अधिक असल्याने निवडीत चुरस

औरंगाबाद जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण ? इच्छुकांची संख्या अधिक असल्याने निवडीत चुरस

googlenewsNext
ठळक मुद्दे२५ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरेशदादांचे निधन झाल्यामुळे अध्यक्षपदासाठी ही निवड होत आहे.दामूअण्णा नवपुते हे  बँकेचे गेल्या तीन महिन्यांपासून  प्रभारी अध्यक्ष आहेत.

औरंगाबाद : येत्या १३ जून रोजी होणाऱ्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. २०२० मध्ये बँकेच्या  विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपत आहे. या पार्श्वभूमीवर ही निवड होत असली तरी अध्यक्ष होण्यास इच्छुक असलेल्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे अवघ्या सात- आठ दिवसांवर आलेल्या या निवडीत चुरस वाढली आहे.

बँकेच्या विद्यमान संचालक मंडळात हरिभाऊ बागडे यांच्यासारखे ज्येष्ठ आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष असलेले एक बडे प्रस्थ आहे. ते औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाचेही अध्यक्ष आहेत. विधानसभेचे अध्यक्ष, दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष आणि फुलंब्रीसारख्या ‘टफ ’ मतदारसंघाकडे द्यावे लागणारे लक्ष यातून हरिभाऊ बागडे यांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष होण्यात फारसे स्वारस्य नसेलही.

नानांना आग्रह होऊ शकतो..... 
हरिभाऊ बागडे यांची आर्थिक शिस्त सर्वपरिचित असल्याने व बँक व्यवस्थित चालायची असेल तर ‘नाना, तुम्हीच अध्यक्ष व्हा’ असा आग्रह होऊ शकतो. या एकूणच प्रक्रियेत हरिभाऊ बागडे यांचा शब्द महत्त्वाचा ठरणार आहे, एवढे नक्की. सुरेशदादा पाटील अध्यक्ष असतानाही स्वत: सुरेशदादा नानांना खूप महत्त्व देत असत व त्यांचा शब्द प्रमाण मानत असत. नाना सत्तेत असल्याने बँकेची विविध कामे करून घेताना त्यांची सतत मदत होत असे. २५ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरेशदादांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी ही निवड होत आहे. नानांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू म्हणून ओळखले जाणारे दामूअण्णा नवपुते हे  बँकेचे गेल्या तीन महिन्यांपासून  प्रभारी अध्यक्ष आहेत. ते अत्यंत संयमी आहेत. कदाचित हरिभाऊ बागडे हे दामूअण्णा नवपुते यांच्यासाठीही आग्रही असू शकतात; पण उर्वरित इच्छुकांमध्येही मोठी नावे आहेत. 

रामकृष्णबाबा, भुमरे, पालोदकर, नितीन पाटील इच्छुक
रामकृष्णबाबा पाटील, आमदार संदीपान भुमरे, प्रभाकर पालोदकर व सुरेशदादा पाटील यांचे चिरंजीव नितीन पाटील हे अध्यक्षपदासाठी प्रबळ उमेदवार असून, १३ तारीख जसजशी जवळ येईल, तसतशी जुळवाजुळवीला गती प्राप्त होणार आहे. सुरेशदादांचा वारस म्हणून नितीन पाटील यांना बिनविरोध अध्यक्ष करण्याची शक्यता फारशी दिसत नाही. रामकृष्णबाबांचे संचालकपद मध्यंतरी रद्द झाले होते. आता त्यांना धरून संचालकांची संख्या १९ होते. तेच अध्यक्षाची निवड करणार आहेत. बँकेच्या मुख्य कार्यालयातील संचालक मंडळाच्या सभागृहात सकाळी ११.३० वा. विभागीय सहनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया सुरू होईल. ११.३० ते १२ वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी अर्ज भरले जातील. नंतर छाननी होऊन निवड प्रक्रिया सुरू होईल. 

असे आहेत संचालक....
हरिभाऊ बागडे, दामूअण्णा नवपुते, नंदकुमार गांधीले, आ.संदीपान भुमरे, अंकुशराव रंधे, मंदाबाई माने, रंगनाथ काळे, अभिजित देशमुख, प्रभाकर पालोदकर, अशोक मगर, पुंडलिक जंगले, वर्षा काळे, किरण पाटील डोणगावकर, जावेद पटेल, बाबूराव पवार, नितीन पाटील, डी. एस. गायकवाड, आ. अब्दुल सत्तार व रामकृष्णबाबा.

Web Title: Who is the President of Aurangabad District Bank?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.