हॉटेलमधील वादातून एपीआयला मारहाण करणारे कोण ? आरोपी १५ दिवसानंतरही मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 13:13 IST2021-02-16T13:09:53+5:302021-02-16T13:13:28+5:30
Who beat up API Satyajeet Taitwale ? जालना रोडवरील ऑन दी रॉक्स या हॉटेलमध्ये १ फेब्रुवारीच्या रात्री ताईतवाले हे मित्रासोबत जेवणासाठी गेले होते. त्यांच्या मित्राचा समोरच्या टेबलवर बसलेल्या अन्य ग्राहकांसोबत किरकोळ वाद झाला होता.

हॉटेलमधील वादातून एपीआयला मारहाण करणारे कोण ? आरोपी १५ दिवसानंतरही मोकाट
औरंगाबाद: हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ कुरबुरीनंतर बाहेर पडलेल्या ग्रामीण पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना बेदम मारहाण करणारे आरोपी १५ दिवसांनंतरही मोकाट आहेत.
जालना रोडवरील ऑन दी रॉक्स या हॉटेलमध्ये १ फेब्रुवारीच्या रात्री ताईतवाले हे मित्रासोबत जेवणासाठी गेले होते. त्यांच्या मित्राचा समोरच्या टेबलवर बसलेल्या अन्य ग्राहकांसोबत किरकोळ वाद झाला होता. हॉटेलचालकाने ताईतवाले यांच्या मित्राच्या कारची चावी काढून घेतल्याने वाद चिघळला होता. साध्या वेशातील ताईतवाले यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. वाद नको म्हणून ताईतवाले हॉटेलमधून बाहेर पडले आणि सिडकोतील एपीआय कॉर्नरकडे निघाले. या भांडणाची माहिती मिळताच हॉटेलमध्ये दाखल झालेल्या सिडको पोलिसांनी ताईतवाले यांच्या मित्रांना पोलिसांच्या वाहनांतून ठाण्यात नेले होते. यावेळी ७ ते ८ आरोपींनी ताईतवाले यांना गाठून त्यांच्या अंगावर दुचाकी घालून खाली पाडले आणि रॉडसह अन्य वस्तूने त्यांच्यावर हल्ला चढविला होता. या घटनेनंतर चार दिवसांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस अधिकाऱ्यावरील हल्ल्याच्या घटनेला आज १५ दिवस उलटले; मात्र पोलिसांना हल्लेखोरापर्यंत पोहोचता आले नाही. गुन्हेगार कोण आहेत, त्यांचा कामधंदा काय आहे. याविषयीची माहिती पोलिसांनी मिळविली आहे.
पुरावे गोळा करून आरोपींना अटक करणार
सपोनि ताईतवाले यांनी हल्लेखोराविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. यामुळे आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करूनच त्यांना अटक केली जाईल. घटनास्थळ पंचनामा झाला. शिवाय सुरुवातीला ज्या हॉटेलमध्ये भांडण झाले होते, त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे.
- विठ्ठल पोटे, पोलीस निरीक्षक, एमआयडीसी सिडको ठाणे