बैलाने लाखोंचे मंगळसूत्र गिळल्याने शेणावर लक्ष ठेवले, पण शेवटी ऑपरेशनचद्वारे काढवे लागले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 18:22 IST2025-11-06T18:19:13+5:302025-11-06T18:22:33+5:30
ऑपरेशनचा खर्च आला, पण 'सौभाग्याचा दागिना' आणि लाडका बैलही वाचला

बैलाने लाखोंचे मंगळसूत्र गिळल्याने शेणावर लक्ष ठेवले, पण शेवटी ऑपरेशनचद्वारे काढवे लागले
अंभई : पाडव्याला औक्षण करत असताना बैलाने महिलेच्या हातातील सुमारे एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र गिळले. शेणातून ते पडण्याची वाटप पाहिली; पण तसे न झाल्याने अखेर १४ दिवसांनंतर ऑपरेशन करून हे मंगळसूत्र काढण्यात आले. त्यामुळे एक लाख रुपयांचे मंगळसूत्र परत मिळालेच शिवाय, लाखमोलाच्या बैलाचेही प्राण वाचले.
सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथील शेतकरीशेतकरी केवलसिंह श्रीभान चिल्हारे यांच्या कुटुंबातील गृहिणींनी २२ ऑक्टोबर रोजी गोवर्धन पूजनाच्या दिवशी बैलांची पूजा केली. नैवेद्य भरवल्यानंतर औक्षण केल्यानंतर परंपरेप्रमाणे सोन्याचा दागिना, मंगळसूत्र त्यांनी बैलाच्या माथ्याला लावण्यासाठी घेतले. परंतु, बैलाने नैवेद्य मिळतोय, असे समजून ताटातील मंगळसूत्रच गिळले. ही बाब लक्षात आल्यानंतर चिल्हारे काही दिवस शेणातून मंगळसूत्र पडते का, यावर लक्ष ठेवून होते. मात्र, तसे न झाल्याने शेवटी त्यांनी तातडीने पशुवैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेतली.
दोन तास चालले ऑपरेशन
सेवानिवृत्त सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ. जी. एल. पाटेवाड यांना बुधवारी (दि. ५) बैलाची तपासणी करून ऑपरेशन केले. दोन तासांच्या अथक परिश्रमाने बैलाच्या पोटातून सुरक्षितरीत्या सोन्याचे मंगळसूत्र बाहेर काढण्यात यश मिळवले. मंगळसूत्र मिळालेच शिवाय बैलाचे प्राणही वाचले. शस्त्रक्रियेसाठी चिल्हारे यांना सुमारे दहा हजारांचा खर्च आला. या शस्त्रक्रिया प्रसंगानंतर बैल सुखरूप असून शेतकरी कुटुंबाने समाधान व्यक्त केले.