पाणी मुरते कुठे ? नाथसागरात आले अवघे २.७ दशलक्ष घनमीटर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 18:55 IST2018-11-21T18:54:43+5:302018-11-21T18:55:22+5:30
जायकवाडी धरणात वरच्या भागातून अतिशय संथगतीने पाण्याची आवक सुरू आहे.

पाणी मुरते कुठे ? नाथसागरात आले अवघे २.७ दशलक्ष घनमीटर पाणी
औरंगाबाद : जायकवाडी धरणात वरच्या भागातून अतिशय संथगतीने पाण्याची आवक सुरू आहे. नाथसागरात मंगळवारी अवघे २.७ दशलक्ष घनमीटर पाणी दाखल झाले. त्यामुळे ‘जायकवाडी’च्या हक्काचे पाणी कुठे मुरते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
निळवंडेतून पाणी सोडल्यानंतर जवळपास १६ बंधारे पार करून आलेल्या पाण्याचा सहाव्या दिवशी सोमवारी मधमेश्वर बंधाऱ्यातून विसर्ग झाला. मधमेश्वर ते जायकवाडी हे अंतर जवळपास १७ कि.मी.चे आहे. निळवंडेतून सोमवारी २ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता, तर ओझर बंधाऱ्यातून १४७६ क्युसेकने विसर्ग होता. यात निळवंडेचा विसर्ग मंगळवारी २०५० इतका झाला आणि ओझर बंधाऱ्यातील विसर्ग १८९५ क्युसेकपर्यंत वाढला. त्यामुळे मधमेश्वर बंधाऱ्यातून होणारा विसर्गही वाढला. मधमेश्वर बंधाऱ्यातून सोमवारी ३२९ क्युसेकने विसर्ग सुरू होता. यात ८२७ क्युसेकपर्यंत वाढ झाली.
निळवंडेबरोबर दारणा प्रकल्पाखालील बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यात आले होते. निळवंडेतून पाण्याचा विसर्ग होत असतानाच अनेक दिवसांनंतर दारणा प्रकल्पाच्या खालील बंधाऱ्यात रोखलेले पाणी सोडले; परंतु तरीही पाण्याची आवक होत नाही. जायकवाडीत बुधवारपर्यंत आणखी पाणी दाखल होईल, असे ‘कडा’तर्फे सांगण्यात आले. जायकवाडीत सोमवारी २९.१३ टक्के पाणीसाठा होता. मंगळवारी साठा २८.९३ टक्क्यांवर आला.
दारणाखाली अडवलेले पाणी
दारणा धरणातून सोडण्यात आलेले पाणी खाली कोल्हापूर बंधाऱ्यांत अडविण्यात आले होते. बंधाऱ्याचे गेट उघडण्यात आल्याने हे पाणी जायकवाडीत पोहोचले आहे. २.७ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिक रणाचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले.