मराठवाड्यासाठी पाणी कधी सोडणार? माजी मंत्री राजेश टोपेंसह आंदोलकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
By सुमित डोळे | Updated: November 20, 2023 19:09 IST2023-11-20T19:06:56+5:302023-11-20T19:09:47+5:30
आंदोलकांच्या पाणी आमच्या हक्काचे, नगर- नाशिक तुपाशी-मराठवाडा उपाशी, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

मराठवाड्यासाठी पाणी कधी सोडणार? माजी मंत्री राजेश टोपेंसह आंदोलकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी रस्तारोको आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या माजीमंत्री राजेश टोपे, अनिल पटेल, पाणी हक्क परिषदेचे नरहरी शिवपुरे, आर. एम. दमगीर आदींनी सिडको- एमआयडीसी पोलिस ठाण्यात ठोस आश्वासनाची मागणी करत आज सायंकाळी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मराठवाड्यासाठी कधी पाणी सोडणार ते जाहीर करावे अशी मागणी आंदोलकांनी केली.
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कधी सोडणार?
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) November 20, 2023
छत्रपती संभाजीनगर: रस्तारोको आंदोलनानंतर ताब्यात घेतलेल्या माजीमंत्री राजेश टोपे, अनिल पटेल, पाणी हक्क परिषदेचे आर. एम. दमगीर आदींचा सिडको- एमआयडीसी पोलिस ठाण्यात ठोस आश्वासनाची मागणी करत ठिय्या pic.twitter.com/dDxfBOxxYs
मराठवाड्याच्या हक्काचे ८.६ टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी रोखून धरले, हे पाणी तातडीने सोडावे या मागणीसाठी आज सकाळी ११ वाजेपासून जालना रोडवर सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन करण्यात आले. जालना रोडचे दोन्ही लेन आंदोलकांनी बंद केल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. तब्बल साडेतीन तासानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना ताब्यात घेतले. माजीमंत्री राजेश टोपे, अनिल पटेल, मराठवाडा पाणी हक्क परिषदेचे, नरहरी शिवपुरे, आर.एम. दमगिर आदी आंदोलकांना पोलिसांनी सिडको- एमआयडीसी ठाण्यात आणले.
दरम्यान, मराठवाड्यासाठी पाणी कधी सोडणार याचे ठोस आश्वासन देण्याची मागणी करत सर्व आंदोलकांनी पोलिस स्टेशनच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांच्या पाणी आमच्या हक्काचे, नगर- नाशिक तुपाशी-मराठवाडा उपाशी, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
ठोस आश्वासन द्या
दुष्काळी परिस्थिति असताना देखील पाणी सोडले जात नाही. तसा कायदा असतानाही २० दिवस झाले तरी पाणी सोडण्याची निश्चित नाही. सरकारने पाणी सोडण्याची नेमकी तारीख जाहीर करावी.
- राजेश टोपे, माजी मंत्री