छत्रपती संभाजीनगरचे नवे बसस्थानक कधी होणार? तोपर्यंत छताला ‘ग्रीन नेट’, रंगरंगोटीही सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 16:00 IST2025-10-20T15:58:59+5:302025-10-20T16:00:02+5:30
इमारत उजळणार, पण मजबुतीचे काय?

छत्रपती संभाजीनगरचे नवे बसस्थानक कधी होणार? तोपर्यंत छताला ‘ग्रीन नेट’, रंगरंगोटीही सुरू
छत्रपती संभाजीनगर : मध्यवर्ती बसस्थानक कधी होईल माहीत नाही. मात्र, नवे बसस्थानक होईपर्यंत प्रवाशांच्या अंगावर प्लास्टर पडू नये, म्हणून एसटी महामंडळाने बसस्थानकाच्या छताला ‘ग्रीन नेट’ लावण्याची ‘आयडिया’ केली आहे. त्याबरोबर जीर्ण झालेल्या बसस्थानकाला रंगरंगाेटी करून उजळविण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.
सिडको बसस्थानकाच्या जागी होणाऱ्या बसपोर्टसह मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामाचे २८ ऑगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झाले. परंतु, भूमिपूजनानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. त्यानंतर मध्यवर्ती बसस्थानकाचे बांधकाम पीपीपी मॉडेलद्वारे करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. काही निविदाही प्राप्त झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्या निविदा आता रद्द करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळ लवकरच नव्याने निविदा मागविणार आहे.
गेल्या १५ वर्षांपासून मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी नवीन बसस्थानक होण्याचा प्रश्न काही केल्या मार्गी लागत नसल्याची स्थिती आहे. नवे बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने मध्यवर्ती बसस्थानकातील काेसळण्याच्या अवस्थेतील प्लास्टर काढून टाकण्याचे काम एसटी महामंडळाकडून करण्यात आले. त्याबरोबरच छताला ‘ग्रीन नेट’ लावण्यावर भर दिला जात आहे. प्रवाशांच्या अंगावर प्लास्टर पडून दुर्घटना टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे.
इमारत उजळणार, पण मजबुतीचे काय?
मध्यवर्ती बसस्थानकाच्या रंगरंगोटीचे काम सध्या सुरू आहे. या रंगरंगोटीमुळे बसस्थानक उजळत आहे. परंतु, ५० वर्षांपेक्षा अधिक जुन्या या बसस्थानकाचे छत आणि भिंती जीर्ण झाल्या आहेत. त्याच्या मजबुतीचे काय, असा सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत.