शेतकरी कर्जमाफी कधी होणार? परतफेडीचे आकडे काय सांगतात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 17:35 IST2025-03-10T17:32:11+5:302025-03-10T17:35:02+5:30
मतांवर डोळा ठेवून विधानसभा निवडणुकीत महायुतीने कर्जमाफी करणार असल्याची घोषणा केली होती.

शेतकरी कर्जमाफी कधी होणार? परतफेडीचे आकडे काय सांगतात?
छत्रपती संभाजीनगर : महायुतीने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्याचा परिणाम परतफेडीवर प्रचंड झाला आहे. बँका परेशान झाल्या आहेत. त्यांना नवीन कर्जवाटप करणे अवघड झाले आहे.
मतांवर डोळा ठेवून विधानसभा निवडणुकीत महायुतीने कर्जमाफी करणार असल्याची घोषणा केली होती. त्याकडे शेतकरी लक्ष ठेवून आहेत. २०१७ ची कर्जमाफीची प्रोत्साहनपर योजनाही पूर्ण झालेली नाही. शेतकऱ्यांनो, आपल्या थकीत पीककर्जाचे नूतनीकरण ३१ मार्चअखेर पूर्ण करून घ्या, जेणेकरून पुढील हंगामासाठी पीककर्ज घेणे सुलभ होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नुकतेच जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीच्या बैठकीत केले.
शेतकऱ्यांचे कर्ज किती थकले?
१ लाख ८८ हजार शेतकऱ्यांचे १७२४ कोटी रुपयांचे पीककर्ज थकले आहे. जिल्ह्यात ४ लाख २० हजार शेतकऱ्यांना ३०३२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
वर्षभरापासून परतफेड लटकली
विधानसभा निवडणुकीपासून कर्ज परतफेड लटकली आहे. एकट्या महाराष्ट्र बँकेची ८४ टक्के परतफेड लटकली. हीच अवस्था स्टेट बँक व जि. म. सहकारी बँकेचीही झाली आहे. निवडणुकीपूर्वी थोडे तरी बरे होते. निवडणुकीनंतर कर्जमाफी होईल, या विश्वासावर परतफेड ठप्प आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा काहीच लाभ होत नाही. कर्जफेड न करणाऱ्यांना दोन-तीनदा लाभ मिळाला. सरकारने कर्जमाफीची घोषणा अमलात आणावी.
- विठ्ठलराव काळे, ताजनापूर, ता. खुलताबाद.
निवडणुकीपूर्वी केलेली कर्जमाफीची घोषणा सरकारने पूर्ण करून दाखवावी. शेतकरी त्याची वाट पाहत आहेत.
- पुंडलिकअप्पा अंभोरे, महाल पिंप्री, ता. छत्रपती संभाजीनगर
बँक अधिकारी पीककर्ज नूतनीकरण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे जातात, तेव्हा ते कर्जमाफी होणार असल्याचे सांगतात. त्यामुळे बँकांचे पीककर्ज थकीत प्रमाण भरपूर वाढले आहे. कर्ज घेतल्यापासून एक वर्षाच्या आत नूतनीकरण करून घेतले असता, रुपये ३ लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराचा फायदा होऊ शकतो. सोबतच कृषी पायाभूत सुविधा, अन्नप्रक्रिया उद्योग, मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती इ. योजनांचा फायदा घेता येतो.
- मंगेश केदार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, छत्रपती संभाजीनगर.