९०० मिमीची जलवाहिनी कधी कार्यान्वित होणार? ७५ तर सोडाच, २५ एमएलडी वाढीव पाणी मिळेना
By मुजीब देवणीकर | Updated: March 14, 2024 15:31 IST2024-03-14T15:30:59+5:302024-03-14T15:31:49+5:30
२७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी किमान मार्च २०२५ उजाडण्याची शक्यता आहे.

९०० मिमीची जलवाहिनी कधी कार्यान्वित होणार? ७५ तर सोडाच, २५ एमएलडी वाढीव पाणी मिळेना
छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाई जाणवू नये म्हणून युद्धपातळीवर २०० कोटी रुपये खर्च करून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. दीड महिन्यापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जलवाहिनीवर वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. ७५ एमएलडी वाढीव पाणी देण्याचा दावा करण्यात आला. नंतर २५ एमएलडी पाणी येईल, असे जाहीर केले. शहर पाण्यासाठी संकटात असतानाही ही जलवाहिनी सुरू झालेली नाही, हे विशेष.
२७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी किमान मार्च २०२५ उजाडण्याची शक्यता आहे. तेव्हापर्यंत शहराला दिलासा मिळावा म्हणून २०० कोटी रुपयांची ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. २० फेब्रुवारी रोजी ७५ एमएलडी पाणी येईल, अशी घोषणा मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केली होती. मागील महिन्यात जलवाहिनीची चाचणी घेण्यासाठी मनपाच्या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला क्रॉस कनेक्शन घेतले. हा प्रयोग पूर्णपणे फसला. जलवाहिनी सुरू करण्यासाठी ४ हजार अश्वशक्तीचा पंप लागतो. हा पंप येण्यास उशीर होऊ लागल्याने ४०० अश्वशक्तीचे तीन पंप बसवून चाचणी केली. जायकवाडी ते फारोळा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत प्रयोग यशस्वी झाला. त्यातून २५ एमएलडी पाणी येईल, असे सांगण्यात आले. आठ दिवसांपासून जलवाहिनीतून अत्यंत गढूळ पाणी येत आहे. हे पाणीही घेणे थांबविण्यात आले. जलवाहिनी स्वच्छ करून पाणी सोडा, असे मनपातर्फे सांगण्यात आले. आठ दिवसांपूर्वी ४ हजार अश्वशक्तीचे दोन पंप आले. हे पंप बसविण्याचे काम सध्या सुरू आहे.
शहर संकटात; तरी जलवाहिनी बंद
९०० मिमी व्यासाची जलवाहिनी १ मार्चला सुरू झाली असती तर शहराला एवढी भीषण पाणीटंचाई भासली नसती. या जलवाहिनीतून किमान ७५ एमएलडी आणि जुन्या ७०० मिमीच्या जलवाहिनीद्वारे ३० एमएलडी, हर्सूल तलावातून ५ एमएलडी असे मिळून ११० एमएलडी पाण्यावर शहराची कशीबशी तहान भागली असती.