गव्हाची पेरणी करायची होती, पण समोर दिसले बिबटे; समृद्धी महामार्गालगतच्या शेतात थरार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 15:42 IST2025-12-13T15:40:10+5:302025-12-13T15:42:40+5:30
१५ मिनिटांत दोनदा बिबट्याचे दर्शन; लासूर स्टेशन परिसरात पिंजरा लावण्याची मागणी

गव्हाची पेरणी करायची होती, पण समोर दिसले बिबटे; समृद्धी महामार्गालगतच्या शेतात थरार!
लासूर स्टेशन ( छत्रपती संभाजीनगर): लासूर स्टेशन आणि नांगरे बाभुळगाव शिवारातून गेलेल्या समृद्धी महामार्गालगत आता बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. या शिवारातील एका शेतकऱ्याला चक्क १५ मिनिटांच्या अंतराने दोनदा दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गव्हाची पेरणी करायची होती, पण समोर दिसले बिबटे
लासूर स्टेशनजवळील अनंतपूर शिवारात शेतकरी भगवान ज्ञानदेव बनकर हे ११ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता आपल्या शेतात गव्हाच्या पेरणीसाठी रोटा मारण्याचे काम करत होते. कपाशी काढून झाल्यावर ते शेत तयार करत असताना, त्यांना अचानक शेतात दोन बिबटे दिसले. बिबट्यांना पाहताच बनकर यांनी वेळ न दवडता ट्रॅक्टर घेऊन आठशे फुटांवर असलेल्या वस्तीकडे धाव घेतली. तिथे भावाला सोबत घेऊन ते परत आले. ट्रॅक्टरच्या लाईटच्या उजेडात त्यांना पुन्हा विहिरीच्या कडेला असलेल्या कठड्यावर (मलम्यावर) ते दोन बिबटे दिसले. १५ मिनिटांत दोनदा दर्शन झाल्यामुळे बनकर यांचा थरकाप उडाला.
व्हिडिओ काढला, शेतातून निघाले
बनकर यांनी तातडीने मोबाईलमधून बिबट्याचा व्हिडिओ काढला आणि शेतातील काम अर्ध्यावर सोडून वस्ती गाठली. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यामुळे लासूर स्टेशन, नांगरे बाभुळगाव आणि समृद्धी महामार्गालगतच्या शिवारात मोठी दहशत निर्माण झाली आहे.
वनविभागाच्या दुर्लक्षावर संताप
बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता शेतकऱ्यांनी रात्रपाळीचे काम बंद केले आहे. समृद्धी महामार्ग जंगलातून जात नसला तरी, महामार्गालगतच्या शेतीत बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी धास्तावले आहेत. वन विभागाने याची गंभीर दखल घेऊन लासूर स्टेशन परिसरात तात्काळ पिंजरा लावावा आणि बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.