कसा होता ७० वर्षांपूर्वीचा पोळा? छत्रपती संभाजीनगरात गुलमंडीवरून निघायची मिरवणूक

By प्रशांत तेलवाडकर | Updated: August 22, 2025 19:42 IST2025-08-22T19:41:00+5:302025-08-22T19:42:05+5:30

छत्रपती संभाजीनगरात ७० वर्षांपूर्वी पोळा सण साजरा करण्यासाठी पंचक्रोशीतील पशुपालक त्यांच्याकडील बैलांना सजवून गुलमंडीवर आणत होते. तिथून मिरवणूक निघत असे. या पोळा सणाची आठवण ताजी करणारे छायाचित्र. खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहे ते आदर्श कुंटे यांनी. त्याचे आजोबा पंडितराव कुंटे यांनी हे छायाचित्र टिपले होते.

What was the Pola Festival like 70 years ago? The procession that started from Gulmandi in Chhatrapati Sambhajinagar | कसा होता ७० वर्षांपूर्वीचा पोळा? छत्रपती संभाजीनगरात गुलमंडीवरून निघायची मिरवणूक

कसा होता ७० वर्षांपूर्वीचा पोळा? छत्रपती संभाजीनगरात गुलमंडीवरून निघायची मिरवणूक

छत्रपती संभाजीनगर : आता पोळा सणाच्या दिवशी मातीचे किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचे बैल घरी आणून त्यांची पूजा केली जाते. मात्र, ७० वर्षांपूर्वी जुन्या शहरात गुलमंडीहून पोळ्याच्या दिवशी सायंकाळी पंचक्रोशीतून आलेल्या बैलांची मिरवणूक काढली जात होती. होय, या आठवणी ताज्या करणारे छायाचित्र खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी, जुन्या स्मृतींना उजाळा देत पुन्हा प्रकाशित केले आहे.

गुलमंडीवरील व्यापारी आदर्श कुंटे यांचे आजोबा पंडितराव कुंटे यांनी ७० वर्षांपूर्वी काढलेले छायाचित्र जिवापाड जपून ठेवले आहे. कै. पंडित कुंटे यांचा मुलगा गोपालराव यांनी सांगितले की, त्यावेळी पोळ्याच्या दिवशी हर्सूल, चिकलठाणा, बेगमपुरा, गारखेडा, पद्मपुरा, कर्णपुरा आदी पंचक्रोशीतून पशुपालक त्यांच्याकडील बैलांना सजवून सायंकाळी गुलमंडीवर आणत होते. सजविलेले बैल पाहण्यासाठी व त्यांचे दर्शन घेण्यासाठी त्यावेळी मोठी गर्दी जमत. या बैलांची वाजत-गाजत मिरवणूक काढली जात होती.

सर्वप्रथम सुपारी हनुमानाचे दर्शन नंतर औरंगपुऱ्यातील दक्षिणमुखी हनुमानाचे दर्शन घेऊन मिरवणूक कुंभारवाडा, जोहरीवाडा, रंगारगल्ली, भांडीबाजार, कासारीबाजार, राजाबाजार, चौराह, दिवाणदेवडीमार्गे पुन्हा गुलमंडीवर येऊन सांगता होत असे. यादरम्यान प्रत्येक दुकानासमोर बैलांना नेले जात, तसेच घरासमोर मिरवणूक आली की, गृहिणी त्या बैलांचे औक्षण करीत व पुरणपोळी खाऊ घालत होत्या. व्यापारी पशुपालकाला पैसे देत. सामाजिक कार्यकर्ते मोहन बोंबले यांनी सांगितले की, ही बैल पोळ्याची मिरवणुकीची प्रथा १९९० च्या दशकानंतर बंद झाली.

म्हणून पडले गोपाळ नाव
जोहरीवाड्यात गोरक्षण कमिटीचे व्यवस्थापक लक्ष्मण कुंटे हे होते. तेव्हा त्या गोशाळेत ‘गोपाळ’ नावाचा बैल होता. उंच व धिप्पाड बैल सर्वांचा आवडता होता. आमचे काका शेषराव कुंटे त्या बैलावर जिवापाड प्रेम करीत होते, तसेच मी त्यांचा लाडका होतो. त्या बैलाच्या आठवणीत माझे नाव ‘गोपाळ’ असे ठेवले.
- गोपाळराव कुंटे, व्यापारी
-------------------------------

Web Title: What was the Pola Festival like 70 years ago? The procession that started from Gulmandi in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.