भाजपला जमलं नाही ते शिक्षक संघाने करून दाखवलं; कोण आहेत सूर्यकांत विश्वासराव ?

By सुमेध उघडे | Published: February 2, 2023 07:52 PM2023-02-02T19:52:31+5:302023-02-02T19:54:07+5:30

सूर्यकांत विश्वासराव यांच्या झंझावातामुळं भाजपचे उमेदवार थेट तिसऱ्या स्थानी

What the BJP could not do, the Marathawada Shikshak Sangha did; Who is teacher candidate Suryakant Vishwasrao? | भाजपला जमलं नाही ते शिक्षक संघाने करून दाखवलं; कोण आहेत सूर्यकांत विश्वासराव ?

भाजपला जमलं नाही ते शिक्षक संघाने करून दाखवलं; कोण आहेत सूर्यकांत विश्वासराव ?

googlenewsNext

औरंगाबाद: भाजपने प्रतिष्ठेची केलेली मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अत्यंत चुरस पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होईल, असं वाटत असताना पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर धक्कादायक निकाल समोर आला. मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांनी जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांच्यापुढं तगडे आव्हान उभं केलं. यामुळे भाजपचे उमेदवार किरण पाटील थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. जे भाजपला जमलं नाही ते शिक्षक संघाने करून दाखवलं अशी चर्चा यामुळे सुरु आहे. 

राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनी पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीच्या मतांवर मोठी आघाडी घेतली आहे. मात्र ते २५ हजार ३ ८६ मतांचा कोटा पूर्ण करू शकले नाहीत. यात तब्बल १३ हजार ५४३ मतं विश्वासराव यांनी खेचल्यामुळं पहिल्या क्रमांकावरील काळे विजयाचा कोटा पूर्ण करू शकले नाहीत. तर विश्वासराव यांच्या झंझावातामुळं भाजपचे उमेदवार किरण पाटील हे १३ हजार ४८६ मते मिळाल्याने थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. यामुळे दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी आणि भाजप अशा तगड्या राजकीय पक्षांना दोन हात करत मराठवाडा शिक्षक संघाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आहे.  

कोण आहेत सूर्यकांत विश्वासराव?
सूर्यकांत विश्वासराव हे मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार आहेत. ते मूळचे कंधार तालुक्यातील धर्मापुरी येथील आहेत. १९८८ पासून शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या कुरळा येथील शाळेत ते शिक्षक होते. शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक अशी पदे भूषवल्यानंतर तब्बल ३५ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले. मराठवाडा शिक्षक संघाचे कंधार तालुकाध्यक्ष, नांदेड जिल्हाध्यक्ष पद त्यांनी भूषवलं आहे. सध्या ते मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष आहेत. संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळं संघटनेनं त्यांना एकमतानं निवडणुकीत उतरवले. शिक्षक मतदारसंघात राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नको म्हणून मराठवाडा शिक्षक संघानं ताकदीनं निवडणूक लढवली होती. त्याचाच परिणाम मतमोजणीतून दिसत आहे.

अन्यथा विजया आमचा होता
दरम्यान, निवडणुकीत पैसा आणि सत्तेचा गैर वापर झाल्याने आमचा मतदार दूर गेला. बोगस मतदार नोंदणी, संस्थाचालकांच्या दबावामुळे आम्हाला मतदान कमी झाले. मतदारांना प्रस्थापितांनी घाबरवले. अन्यथा विजय आमचा असता, अशी प्रतिक्रिया सुर्यकांत विश्वासराव यांनी दिली. 

सुरुवातीला मतदारसंघावर शिक्षक संघाचे होते वर्चस्व 
१९७४ साली पहिल्यांदा या मतदारसंघात निवडणूक झाली. तेव्हापासून २००४ पर्यंत शिक्षक संघाचे वर्चस्व या मतदारसंघावर होते. राष्ट्रवादीच्या वंसत काळे यांनी २००४ साली हा मतदारसंघ शिक्षक संघाकडून ताब्यात घेतला. वसंत काळे यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनी २००६ पासून २०२३ या मतदारसंघातून हॅट्ट्रिक केली आहे. 

Web Title: What the BJP could not do, the Marathawada Shikshak Sangha did; Who is teacher candidate Suryakant Vishwasrao?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.