काय सांगता ! एका उंदराने शहराचा पाणीपुरवठा २४ तास बंद केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 13:56 IST2021-02-20T13:53:12+5:302021-02-20T13:56:09+5:30
गुरुवारी पहाटे जायकवाडी धरणातील मुख्य पंपगृहात जलवाहिनीच्या पंपांना वीजपुरवठा करणार्या पॅनल बोर्डमध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला.

काय सांगता ! एका उंदराने शहराचा पाणीपुरवठा २४ तास बंद केला
औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी पाण्याचा उपसा करणार्या विद्युत मोटारीजवळील पॅनल बोर्डमध्ये एका उंदराने गुरुवारी पहाटे केबल कुरतडली. त्यानंतर शॉक लागून उंदीरही मेला. शॉर्टसर्किटमुळे संपूर्ण केबल जळाली. महापालिकेच्या यांत्रिकी विभागाला केबल बदलणे आणि इतर दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल चोवीस तास लागले. शुक्रवारी सकाळी शहरात पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला.
गुरुवारी पहाटे जायकवाडी धरणातील मुख्य पंपगृहात जलवाहिनीच्या पंपांना वीजपुरवठा करणार्या पॅनल बोर्डमध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहानिशा केली असता, एका उंदराने केबल कुरतडली होती. उंदराला नंतर शोक लागल्यामुळे पॅनल बोर्डमधील केबल शॉर्टसर्किटने जळाली. या भागातील ट्रान्सफाॅर्मर सुद्धा खराब झाला होता. उपअभियंता बी. डी. घुले यांनी पर्यायी ट्रान्सफार्मर बसवून त्याची चाचणी करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी चार वाजता पंपिंग सुरू करून पाणी उपसा सुरू झाला. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात हे पाणी दाखल झाल्यानंतर त्यावर प्रक्रिया होऊन रात्री साडेनऊ वाजता शहरातील जलकुंभांत पाणी पडले. यानंतर शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत जलकुंभ भरल्यानंतर मागील बुधवारी व गुरुवारी सिडको-हडकोसह ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होऊ शकला नाही, तेथे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शुक्रवारी दिवसभरात बहुतांश वसाहतींना पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली.
शहरात तीव्र पाणीटंचाई
बुधवारी, गुरुवारी ज्या वसाहतींमध्ये पाणी आले नाही, तेथील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना शुक्रवारी एकसारखे फोन करून, आज आमच्या वसाहतीत पाणी येणार की नाही, अशी विचारणा केली. तसेच काही नागरिकांनी आपल्या भागातील लोकप्रतिनिधींना पाण्यासाठी भंडावून सोडले. दरम्यान, मध्य मतदारसंघाचे आ. प्रदीप जैस्वाल यांनीही कार्यकारी अभियंता धांडे यांना फोन करून पाण्याविषयी विचारणा केल्याचे सूत्रांनी सांगितले.