शाब्बास! श्वान टिपूने पकडून दिले टोकी दरोड्यातील सात दरोडेखोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 12:15 IST2025-05-03T12:08:11+5:302025-05-03T12:15:01+5:30
घटनास्थळी आरोपींनी वापरलेली वस्तू टिपूला हुंगवताच टिपूने वास घेत थेट शिंधी शिरसगाव गायरानातील एका पत्र्याच्या घराजवळ थांबत जोरजोरात भुंकला.

शाब्बास! श्वान टिपूने पकडून दिले टोकी दरोड्यातील सात दरोडेखोर
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलिसांनी टोकी शेतवस्ती परिसरात पडलेल्या दरोड्याचा अवघ्या काही तासांत छडा लावण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे, या गुन्ह्याच्या तपासात श्वान टिपू याने निर्णायक भूमिका बजावली.
दि. ३० एप्रिल रोजी कारभारी शेजवळ यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले. पहाटे ४:४० वाजता श्वान टिपू व त्याचे प्रशिक्षक पोलिस कर्मचारी घटनास्थळी गेले. घटनास्थळी आरोपींनी वापरलेली वस्तू टिपूला हुंगवताच टिपूने वास घेत थेट शिंधी शिरसगाव गायरानातील एका पत्र्याच्या घराजवळ थांबत जोरजोरात भुंकला. घर कुलूपबंद होते. गावकऱ्यांच्या माहितीनुसार ते घर रवी जगताप काळे याचे होते. पोलिसांनी रवी काळे याला हुडकून वाळूज परिसरातील एका घरातून ताब्यात घेतले. नंतर अर्जुन चंद्रकांत काळे, अजय मुकेश काळे, आकाश येल्लाप्पा काळे, विशाल बल्या भोसले, रवी जगताप काळे, शक्तिमान वसंत काळे, विक्की ठकसेन काळे यांना उचलले. या सर्व आरोपींवर दरोडा, गंभीर मारहाण, चोरी आणि खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे दाखल असून अजूनही काही आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे.
सदरील कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त संजय सानप, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय गिते, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांच्या पथकाने केली. सदरील अटक आरोपींना ५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर करीत आहेत.
टिपू ठरला हिरो
या कारवाईत खऱ्या अर्थाने 'नायक' ठरला श्वान 'टिपू'. त्याच्या हुशारी, गंधशक्ती आणि प्रशिक्षित प्रतिसादामुळे पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्याचे प्रशिक्षक स. फौजदार तनपुरे व हवालदार जवळकर यांची भूमिकाही कौतुकास्पद आहे.