आम्ही आता घेतो, तुम्ही फेडत बसा ११०० कोटींचे कर्ज; छत्रपती संभाजीनगर मनपाकडे पैसाच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 17:58 IST2025-03-25T17:57:32+5:302025-03-25T17:58:00+5:30
जवळपास ११०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याशिवाय मनपाकडे पर्याय उरला नाही.

आम्ही आता घेतो, तुम्ही फेडत बसा ११०० कोटींचे कर्ज; छत्रपती संभाजीनगर मनपाकडे पैसाच नाही
छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेत ८२२ कोटी रुपयांचा वाटा टाकण्यासाठी मनपाच्या तिजोरीत पैसे नाहीत. शहर सेफ्टिक टँकमुक्त करण्यासाठी जवळपास ८०० कोटी रुपये खर्च करून ड्रेनेज लाइन टाकण्यात येत आहेत. या योजनेतही मनपाला २६५ कोटींचा वाटा टाकावा लागणार आहे. त्याशिवाय केंद्र, राज्य शासन पैसेच देणार नाही. त्यामुळे जवळपास ११०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याशिवाय मनपाकडे पर्याय उरला नाही. आम्ही घेतो तुम्ही (भावी नगरसेवक) फेडत बसा, अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होईल.
केंद्र आणि राज्य सरकारच्या अमृत-२ योजनेतून सातारा देवळाईसह शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील नवीन वसाहतींमध्ये ड्रेनेज लाइन टाकण्यात येणार आहेत. सातारा-देवळाई येथे जवळपास ७० टक्के काम पूर्णही झाले आहे. उर्वरित प्रकल्प सुरू असून, प्रकल्पासाठी जवळपास ८८७ कोटी रुपये खर्च लागणार आहे. या योजनेत मनपाला ३० टक्के स्वहिस्सा म्हणून २६५ कोटी रुपयांचा निधी टाकावा लागणार आहे.
मनपाची आर्थिक परिस्थिती सर्वश्रुत आहे. योजनेत स्वहिस्सा तर टाकावा लागणारच आहे. त्यामुळे प्रशासनासमोर कर्ज घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाने हमी घेत वित्तीय संस्थेकडून ८२२ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून तयारी सुरू केली. आता ड्रेनेजसाठी २६५ कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागणार आहे. १ हजार ८७ रुपयांचे कर्ज घेतले तरी परतफेड येणाऱ्या काही वर्षांत करावी लागेल. पुढील काही वर्षे मनपात येणाऱ्या नगरसेवकांना विकासकामांसाठी पैसेच शिल्लक राहणार नाहीत.