मराठवाड्यातील १४४ गावांना हिवाळ्यातच टँकरद्वारे पाणी; टँकरने ओलांडला १०० चा आकडा
By विकास राऊत | Updated: November 17, 2023 19:59 IST2023-11-17T19:59:15+5:302023-11-17T19:59:33+5:30
प्रशासनाने विभागात ४०४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

मराठवाड्यातील १४४ गावांना हिवाळ्यातच टँकरद्वारे पाणी; टँकरने ओलांडला १०० चा आकडा
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात येणाऱ्या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. हिवाळ्यातच विभागातील १४४ गावे तहानली असून, त्यांना १४३ टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. ४०४ विहिरी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. ११८ गावे आणि २६ वाड्या सध्या तहानल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी १०० च्या आसपास टँकरने पाणीपुरवठा होता. दिवाळीनंतर त्यात ४३ टँकरची भर पडली आहे.
गेल्या पावसाळ्यात मराठवाड्यात १५ टक्के पाऊस झाला. त्यातच नांदेड, हिंगोली वगळता सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा खंड राहिला. परिणामी सिंचन प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. पुढील दोन ते तीन महिन्यांत प्रकल्प कोरडे होतील. त्यानंतर मात्र विभागातील सहा जिल्ह्यांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागतील. सध्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील १४४ गावांमध्ये १४३ टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. विभागीय प्रशासनाने गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची आगामी काळातील टंचाईच्या अनुषंगाने बैठक घेऊन नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत.
४०४ विहिरींचे अधिग्रहण....
प्रशासनाने विभागात ४०४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. यात टँकरसाठी ६९, तर टँकर व्यतिरिक्त २५४ विहिरींचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना या जिल्ह्यांतील ७० विहिरी प्रशासनाने ताब्यात (अधिग्रहीत) घेतल्या आहेत.