५६ बंगल्यांना नळपट्टी; परंतु नळाला पाण्याचा थेंब नाही
By साहेबराव हिवराळे | Updated: November 13, 2023 17:04 IST2023-11-13T17:03:48+5:302023-11-13T17:04:44+5:30
एक दिवस एक वसाहत; तोरणागडनगरात पावसाळ्यात सरपटणारे प्राणी अंगणात, जॉगिंग पार्कमध्ये साहित्याचे सांगाडे

५६ बंगल्यांना नळपट्टी; परंतु नळाला पाण्याचा थेंब नाही
छत्रपती संभाजीनगर : एन-२ तोरणागडनगर येथील नागरिकांना विविध नागरी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ५६ प्रशस्त घरधारकांना नळपट्टी भरूनही पाण्याचा एक थेंबही मिळत नाही.
पावसाळ्यात सरपटणारे प्राणी अंगणात दिसतात तर जॉगिंग पार्कमध्ये व्यायामासाठी असलेल्या साहित्याचे सांगाडे शिल्लक राहिले आहेत. जालना रोड तसेच चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतून वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा तसेच सांडपाण्यामुळे दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्ता छान झाला असल्याने भरधाव वाहनांमुळे रोज किरकोळ अपघात होत आहेत. येथे शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच डॉक्टर, वकील, अभियंता, आयटी क्षेत्रात तसेच काॅर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे तसेच उद्योजक, महसूल, पोलिस कर्मचारीदेखील वास्तव्यास आहेत. या भागात असलेल्या जलवाहिनीचे पाणी कमी दाबाने येत असल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे. नाईलाजास्तव पाण्याचे टँकरही मागवावे लागत आहेत.
दखल घेतली नाही तर आंदोलन
तोरणागडनगरातील प्रश्नाकडे सातत्याने लक्ष द्या, असे मनपाला तसेच सिडकोला कळवूनही दुर्लक्ष केले जात आहे. पाणी, ड्रेनेजसह विजेच्या प्रश्नांची सोडवणूक करा, अन्यथा आंदोलन छेडावे लागेल.
- भरत दाभाडे
पोलिसांची गस्त हवी
भाजी मंडईचे गाळे सिडकोने वाटप केले; परंतु, त्या गाळ्यात एकही भाजी विक्रेता बसत नाही, त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून किंवा मुकुंदवाडीतून भाजीपाला विकत आणावा लागतो. रात्री रस्त्यावर काही जणांचा गोंधळ सुरू असतो. अंधारात लूटमारीचे प्रकार होण्याची भीती आहे. पोलिसांची गस्त आवश्यक आहे.
- शैलजा कुलकर्णी
जलकुंभाच्या कामाचे काय?
पिण्याचे पाणी कमी दाबाने येते. बहुतांश नागरिकांना पाणीपुरवठाच केला जात नाही. जलकुंभाचे काम लवकर होईल अन् पाणी मिळेल, अशी आशा नागरिक बाळगून आहेत.
- अनिता शहाणे