गावागावांतील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:56 IST2019-05-17T21:56:26+5:302019-05-17T21:56:39+5:30
वाळूजमहानगर परिसरातील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्यात एमआयडीसीकडून जवळपास ५० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे.

गावागावांतील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले
वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरातील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्यात एमआयडीसीकडून जवळपास ५० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. याचा फटका ग्रामपंचायतींना बसत असून, गावागावांतील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रात पूर्वी घातक रसायनयुक्त सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्यामुळे ते जमिनीत पाझरुन परिसरातील जलसाठे प्रदूषित झाले आहेत. वाळूज महानगर परिसरातील विहिरी, हातपंप, बोअरवेल आदींचे पाणीही दूषित झाले आहे. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्यामुळे याचा पुरवठा ग्रामपंचायतींना थांबविला आहे. रांजणगाव, जोगेश्वरी, घाणेगाव, वडगाव, पंढरपूर, वाळूज, वळदगाव आदी ग्रामपंचायतीच्या वतीने एमआयडीसीकडे पाणीपट्टी भरण्याची तयारी दर्शविल्यानंतर दशकभरापासून यातील काही ग्रामपंचायतीना एमआयडीसीने पाणी पुरवठा सुरु केला आहे.
सध्या जायकवाडी जलाशयात अत्यल्प जलसाठा असल्यामुळे एमआयडीसी प्रशासनाच्यावतीने महिनाभरापूर्वी उद्योग व निवासी क्षेत्रात पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा सर्वाधिक फटका वाळूज, पंढरपूर, वडगाव, रांजणगाव, जोगेश्वरी आदी ग्रामपंचायतींना बसला आहे. पूर्वी या ग्रामपंचायतीला २४ तास पाणी पुरवठा करण्यात येत होता. आता फक्त १२ तास पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने अघोषित ५० टक्के पाणी कपात केल्याचा आरोप स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.