जोडणीचे काम संपले, आता व्हॉल्व्हला गळती; ३ दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरात पाणी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 12:35 IST2024-11-29T12:32:31+5:302024-11-29T12:35:00+5:30
छत्रपती संभाजीनगरात पाण्याचा ठणठणाट, पाण्यासाठी नागरिकांची वणवण

जोडणीचे काम संपले, आता व्हॉल्व्हला गळती; ३ दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरात पाणी नाही
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय)पैठण रोडच्या चौपदरीकरणासाठी १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी जोडणीचे काम संपल्यानंतर गुरुवारी पहाटे ३ वाजता जायकवाडीतून शहराला पाणीपुरवठा सुरू केला. मात्र कवडगावजवळ जलवाहिनीवरील व्हॉल्व्हचे रबरसील खराब झाल्याने गळती लागल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने जायकवाडी येथून पाणीपुरवठा बंद करावा लागला. दुरुस्तीनंतर सायंकाळी ६ ते ७ वाजेच्या सुमारास शहरात पाणी आले. शहरात तिसऱ्या दिवशीही पाण्याचा ठणठणाट होता, नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली.
अनेक वसाहतींचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. दोन ते तीन दिवसांनी ते लांबल्यामुळे पाणीपुरवठा कधी होणार, हे अद्याप निश्चित नाही. एनएचएआयचे काम संपताच जायकवाडीतून पंपिंग सुुरू केले. मनपाच्या पथकाकडून जलवाहिनी जोडणीची पाहणी सुरू असताना कवडगाव येथे जोडणीवरील व्हॉल्व्हला गळती लागल्याचे दिसून आले. पथकाने जायकवाडी येथून सुरू केलेली पंपिंग बंद केली. त्यानंतर व्हॉल्व्हला लावलेले रबरसील खराब झाल्यामुळे त्यातून पाणी येत असल्याचे आढळून आले. त्याची दुरुस्ती करण्यात आली. दुपारी चार वाजेदरम्यान व्हॉल्व्हची दुरुस्ती पूर्ण झाली. पुन्हा जलवाहिनी भरण्यासाठी जायकवाडी येथून पंपिंग सुरू केले. जलवाहिनीत पाणी असल्यामुळे पंपिंग सुरू करताच सायंकाळी सहा ते सात वाजेच्या शहरातील जलकुंभात पाणी आले. जलवाहिनी जोडणीसह दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, कंत्राटदारांचे मजूर, वेल्डर, फिटर, मशीन ऑपरेटर यांनी सहकार्य केले.
तीन दिवसांपासून शहरात पाणी नाही
मुख्य जलवाहिनी जोडण्यासाठी ४८ तास पाणीपुरवठा बंद होता. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर व्हॉल्व्हला गळती लागली. परिणामी गुरुवारी सकाळी सुरू होणारा पाणीपुरवठा सायंकाळी सुरू झाला. तीन दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा बंद आहे. वेळापत्रक दोन दिवसांनी पुढे ढकलले आहे. शहरात पाण्याचा ठणठणाट असून, याकाळात नागरिकांची पाण्यासाठी वणवण झाली.