जायकवाडीत जॅकवेलनंतर ३७०० HP पंपाची चाचणी यशस्वी, जलवाहिनीत ४ किमीपर्यंत आले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:55 IST2026-03-24T13:53:31+5:302026-03-24T13:55:01+5:30

३८ किमी आहे २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी; स्वच्छतेसाठी लागणार किमान ८ ते १० दिवस

Water from new water supply scheme reaches 4 km; Test of 3700 HP pump at Jayakwadi jackwell successful | जायकवाडीत जॅकवेलनंतर ३७०० HP पंपाची चाचणी यशस्वी, जलवाहिनीत ४ किमीपर्यंत आले पाणी

जायकवाडीत जॅकवेलनंतर ३७०० HP पंपाची चाचणी यशस्वी, जलवाहिनीत ४ किमीपर्यंत आले पाणी

 

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणी पुरवठा योजनेचा आणखी एक मोठा टप्पा सोमवारी पार पडला. जायकवाडी धरणात उभारलेल्या जॅकवेलवरील ३७०० अश्वशक्तीचे पंप सुरू करून २५०० मिमी व्यासाच्या महाकाय जलवाहिनीत रात्री ८ वाजता पाणी घेण्यात आले. ४ किमी अंतरापर्यंत हे पाणी घेऊन जलवाहिनी धुवून स्वच्छ करण्यात आली. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत ही चाचणी यशस्वी पार पडली.

२७४० कोटी रुपये खर्च करून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील महत्त्वाचे विविध टप्पे हळूहळू पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण करत येत आहेत. योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून शहरात २०० एमएलडी वाढीव पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी जायकवाडी धरणातील पाणी सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये घेण्यात आले. जॅकवेलमध्ये तीन दिवस पाणी ठेवण्यात आले. जॅकवेलला कुठेही मोठे लिकेज नसल्याचे निदर्शनास आले. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच जॅकवेलवर पंपिंगची टेस्टिंग घेण्याची कवायत सुरू झाली. महावीर हायड्रो, फ्लूट इलेक्ट्रोमेट आणि जीव्हीपीआर यांनी मिळून टेस्टिंगची प्रक्रिया पूर्ण केली. सायंकाळी ५ वाजता टेस्टिंगला सुरुवात करण्यात येणार होती. छोट्या-मोठ्या तांत्रिक अडचणींमुळे चाचणीला विलंब झाला. रात्री ८ वाजता आयुक्त जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत पंप सुरू करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह जीव्हीपीआर कंपनीचे महाव्यवस्थापक महेंद्र गोगुलोथु आदी उपस्थित होते.

चाचणी यशस्वी झाली

आयुक्त जी. श्रीकांत आणि मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ३७०० अश्वशक्तीच्या पंपाची चाचणी रात्री यशस्वी झाली. तब्बल १ तास पंप सुरू होता. रात्री ९:०० वाजता पंप बंद करण्यात आला. २५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीत पाणी घेण्यात आले. १ किमी अंतरावर स्मशानभूमीजवळ एक स्कोअर व्हॉल्व्ह आहे, त्यातून पाणी बाहेर काढण्यात येत होते. चाचणीची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

४ किमीपर्यंत आले पाणी
जायकवाडी धरणापासून नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनीची लांबी ३८ किमी आहे. प्रत्येक ४ ते ५ किमी अंतरावर पाणी सोडण्यासाठी स्कोअर व्हॉल्व्ह सोडला आहे. त्यातून अशुद्ध पाणी बाहेर सोडण्यात येईल. जलवाहिनी स्वच्छ करण्याची ही प्रक्रिया किमान ८ ते १० दिवस चालणार आहे.

Web Title : जायकवाड़ी: 3700 एचपी पंप परीक्षण सफल, पानी 4 किमी तक पहुंचा

Web Summary : जायकवाड़ी की नई जल परियोजना में मील का पत्थर। 3700 एचपी पंप का परीक्षण सफल, पाइपलाइन से 4 किमी तक पानी भेजा गया। सफाई जारी है।

Web Title : Jaikwadi: 3700 HP Pump Test Successful, Water Reaches 4 km

Web Summary : Jaikwadi's new water project achieved a milestone. A 3700 HP pump test succeeded, sending water 4 km through the pipeline. Cleaning continues.