दागिने सांभाळा, छत्रपती संभाजीनगरात एक किलोमीटरवर दोन ठिकाणी साेनसाखळी चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 13:44 IST2024-10-11T13:44:27+5:302024-10-11T13:44:48+5:30
कर्णपुरा यात्रेत चोरांचा सुळसुळाट असताना आता शहरात देखील सोनसाखळी चोर सक्रिय झाले आहे.

दागिने सांभाळा, छत्रपती संभाजीनगरात एक किलोमीटरवर दोन ठिकाणी साेनसाखळी चोरी
छत्रपती संभाजीनगर : जवाहरनगरमधील रिद्धिसिद्धी हॉल व उस्मानपुऱ्यातील एसबीएच कॉलनीत एक किलोमीटरच्या अंतरावर दीड तासांत चोरांनी दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ६:३० ते ८ या वेळेत ही लुटमार झाली.
कर्णपुरा यात्रेत चोरांचा सुळसुळाट असताना आता शहरात देखील सोनसाखळी चोर सक्रिय झाले आहे. नवरात्रीनिमित्त पहाटे मंदिरात जाणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याने सोनसाखळी चोरांचा वावर वाढला आहे. प्रिया धाडीवाल (६३, सहयोगनगर) या ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ६:३० वाजता मंदिरात गेल्या होत्या होत्या. रिद्धीसिद्धी हॉलसमोरून त्या एकट्याच पायी घरी जात असताना मागून आलेल्या दुचाकीस्वार चोरांनी त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅमची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला.
तर विद्या डंक (६९, रा. न्यू एस.बी.एच कॉलनी) या ज्योतीनगरमध्ये देवीच्या पूजेसाठी फुले तोडून घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या चोरांनी त्यांच्या गळ्यातील १.५ तोळ्याची सोनसाखळी हिसकावून नेली. जवाहरनगर, उस्मानपुरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.